पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर
- Advertisement -


मुंबई, दि. २८ : मुंबईतील जुन्या इमारती, चाळी तसेच पुनर्विकास प्रकल्पांतील रहिवाशांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिले.

विधानभवनातील दालनात मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.बैठकीत कलशेटकर कंपाउंड येथील ९५ वर्षे जुन्या ‘रामदास मंडळा’स पुनर्विकसित इमारतीमध्ये योग्य जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच हररवाला बिल्डिंग क्र. १८ व १९ मधील रहिवाशांना पुनर्विकासादरम्यान देण्यात येणाऱ्या भाड्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला.

याशिवाय यदुवंशी अहिर ग्वाल सकल पंच, कृष्ण छाया (दुरुस्ती इमारत), खिमजी नाणजी कोठारी चाळ, अयोध्या सोसायटी तसेच वॉर्डन वकील चाळ येथील रहिवाशांच्या विविध समस्या आणि तक्रारींवरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

पुनर्विकास प्रक्रियेत मूळ रहिवासी किंवा स्थानिक संस्थांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, याची दक्षता घेऊन प्राप्त तक्रारींवर तातडीने सकारात्मक कार्यवाही करावी. तसेच पात्र रहिवाशांना लवकरात लवकर दिलासा मिळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

००००

मोहिनी राणे/स.सं

 



Source link

- Advertisement -