मुंबई उपनगर जिल्ह्यात वांद्रे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान

मुंबई उपनगर जिल्ह्यात वांद्रे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान
- Advertisement -


 

लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण

मुंबई, दि. २८ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील वांद्रे येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार वरुण सरदेसाई, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यातील नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले प्रातिनिधिक स्वरूपात वितरित करण्यात आले. नागरिकांनी विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये अधिकाधिक सहभाग नोंदवून शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी प्रास्ताविकात या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना महसूल विषयक सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देणे हा असल्याचे सांगितले.

शिबिरामध्ये लोकसेवा हक्क अधिनियम-२०१५ अंतर्गत विविध दाखले, ७/१२ उतारे, आधार नोंदणी, रेशनिंगसंबंधित प्रलंबित कामे तसेच विविध योजनांचे अर्ज स्वीकारून अनेक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात आली. तसेच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना आणि आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.

महसूल विभाग, नगर भूमापन कार्यालय, बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग, शिधावाटप कार्यालय, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा), महिला बचत गट, समाज कल्याण विभाग आदी कार्यालयांचे स्वतंत्र स्टॉल शिबिरामध्ये लावण्यात आले होते.

या अभियानांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून, प्रलंबित महसूल प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या महसूल विषयक अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी गावपातळीवर तसेच कार्यालयीन स्तरावर विशेष प्रयत्न करत आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ७ ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, या शिबिरांद्वारे एकूण २५०० पेक्षा अधिक प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात २२ जुलै २०२६ ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे.

००००



Source link

- Advertisement -