
नाशिक, दि. २५ ऑक्टोबर २०२६ (जिमाका वृत्तसेवा) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा. कुंभमेळा हा केवळ प्रशासनाचा किंवा लोकप्रतिनिधींचा कार्यक्रम नसून संपूर्ण नाशिककरांचा उत्सव आहे. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक घरावर भगवा ध्वज लावून कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी नागरिकांनी सज्ज व्हावे, असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.
३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने आज पालकमंत्री महाजन यांनी त्यांच्या निवासस्थानी भगवा ध्वज फडकवून या अभियानास प्रारंभ केला. यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री महाजन म्हणाले की, या सोहळ्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या औपचारिक प्रारंभाची नांदी होणार असून, त्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात लोकसहभागातून वातावरणनिर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे. मागील कुंभमेळ्यात सुमारे तीन ते सव्वातीन कोटी भाविक सहभागी झाले होते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची संख्या सुमारे १२ कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज असल्याने गर्दीचे व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि स्नानघाटावरील नियोजन यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागणार आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील भौगोलिक परिस्थिती तसेच उपलब्ध जागेच्या मर्यादा लक्षात घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गांभीर्याने काम करावे, असे त्यांनी सांगितले.
कुंभमेळा हा श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. या सोहळ्यासाठी भाविकांना स्वतंत्र निमंत्रण देण्याची आवश्यकता नसते. देशभरातून भाविक स्वयंस्फूर्तीने या धार्मिक पर्वात सहभागी होतात. त्यामुळे कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशासकीय तयारीसोबतच नागरिकांचा सक्रिय सहभागही तितकाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकला पाहिजे आणि संपूर्ण नाशिक शहर भगव्या ध्वजांनी सजलेले दिसले पाहिजे. यासाठी संबंधितांनी आपापल्या परिसरात घरोघरी संपर्क साधून नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे. ध्वज लावण्यासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांच्या सहकार्याने हे अभियान व्यापक स्वरूपात राबवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कुंभमेळा हा प्रत्येक नाशिककरांचा उत्सव असल्याची भावना नागरिकांच्या मनात रुजविणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या गावासाठी आणि शहरासाठी जबाबदारी स्वीकारून या उपक्रमात योगदान दिल्यास संपूर्ण देशात नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि लोकसहभागाचा सकारात्मक संदेश जाईल, असा विश्वास पालकमंत्री महाजन यांनी व्यक्त केला. ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित विविध कार्यक्रमांसह या उपक्रमातही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा भव्य, सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातही पालकमंत्री महाजन, उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी सहभाग नोंदविला.
००००

WhatsApp