
मुंबई, दि. २४: शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे. प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता राखून योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक करण्यावर भर द्यावा,असे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे मंत्री तथा ‘वनार्टी’चे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले.
पुणे यशदा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग आणि स्व. वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निवासी प्रशिक्षण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री श्री. सावे बोलत होते. यावेळी भटके-विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्राचे अध्यक्ष उद्धवराव काळे, इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव आप्पासो धुळाज, ‘वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे, राज्यस्तरीय अशासकीय सदस्य राजेंद्र दोनाडकर, डॉ. संजय पुरी, नरेश पोटे, शरद माकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अशासकीय सदस्य, विभागाचे क्षेत्रीय अधिकारी आणि महसूल विभागाचे क्षेत्रीय अधिकारी यांचे २४ व २५ ऑक्टोबरदरम्यान हे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजे उमाजी नाईक आणि वसंतराव नाईक यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
मंत्री श्री. सावे म्हणाले की, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. प्रशासकीय नियम व कार्यपद्धतींचे पालन करताना क्षेत्रीय स्तरावरील कामकाज अधिक सक्षम आणि परिणामकारक करण्यावर भर दिला पाहिजे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विभागाच्या योजनांची अंमलबजावणी अधिक सुसूत्रपणे करण्यास मदत होईल.
प्रशिक्षण शिबीरात विभागाच्या विविध योजना, शासकीय नियम व कार्यपद्धती, प्रशासकीय जबाबदाऱ्या, योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि क्षेत्रीय स्तरावरील समन्वय या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महात्मा फुले यांच्या समताधिष्ठित विचारांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या ध्येयाशी सुसंगतपणे बहुजन समाजाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांना अधिक गती देणे, हा या प्रशिक्षण शिबिराचा प्रमुख उद्देश असल्याचे वनार्टी’चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत वावगे यांनी सांगितले.
००००

WhatsApp