
मुंबई, दि. २४: अमली पदार्थांचे व्यसन ही समाजापुढील, विशेषतः तरुण पिढीसमोरील गंभीर समस्या आहे. अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्याबरोबरच त्यांची मागणी कमी करण्यासाठी जनजागृती, प्रतिबंध, पुनर्वसन आणि व्यसनाधीन व्यक्तींना आधार देणे आवश्यक आहे. तरुण पिढीने अमली पदार्थमुक्त भारताचे राजदूत बनून जनजागृती, प्रतिबंध आणि पुनर्वसनावर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘नशामुक्त भारत – फाईट अगेन्स्ट ड्रग्ज’ या राष्ट्रीय मोटारसायकल रॅलीच्या शुभारंभप्रसंगी राज्यपाल बोलत होते. नरीमन पॉईंट येथे झालेल्या या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे आणि राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांच्यासह विविध राज्यांतील पोलीस अधिकारी,कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोटारसायकल रॅलीला गुजरातकडे प्रस्थान देण्यात आले. विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील पोलीस दलांचे प्रतिनिधी तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी व जवान या रॅलीत सहभागी झाले आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याबरोबरच तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करणे हा या रॅलीचा उद्देश आहे. ही रॅली गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचणार आहे.
राष्ट्रीय एकात्मतेच्या रक्षणासाठी सदैव सतर्क राहणे आवश्यक
राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी विविध संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण घडवून आणण्यात ऐतिहासिक आणि निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे सशक्त आणि एकसंध भारताचा पाया घातला गेला. राष्ट्रीय एकात्मतेचे रक्षण करण्यासाठी आपण सदैव सतर्क राहिले पाहिजे.
महाराष्ट्र पोलीस दल आपली कार्यकुशलता, समर्पण आणि उत्कृष्ट सेवेसाठी देशभरात ओळखले जाते. राज्यात शांतता, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच सुरक्षित व उद्योगस्नेही वातावरण निर्माण करण्यात पोलिसांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
गडचिरोलीतील नक्षलवादी कारवाया नियंत्रणातही महाराष्ट्र पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गडचिरोली जिल्हा आता महत्त्वाचे पोलाद केंद्र म्हणून उदयास येत असून, तेथे विकासाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अमली पदार्थांचा पुरवठा रोखण्यासोबत मागणी कमी करण्यावरही भर द्यावा
अमली पदार्थांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी त्यांचा पुरवठा रोखण्याबरोबरच मागणी कमी करण्यावरही लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अमली पदार्थांची तस्करी रोखणे तसेच तस्कर आणि विक्रेत्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करणे ही जबाबदारी पोलीस आणि अमली पदार्थविरोधी यंत्रणांची आहे. मात्र, अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, पुनर्वसन आणि व्यसनाधीन व्यक्तींना आधार देणे आवश्यक असल्याचे सांगत राज्यपाल श्री. वर्मा यांनी अमली पदार्थ विरोधी कृतीदलाच्या कारवायांबाबत समाधान व्यक्त केले.
महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘नशामुक्त भारत अभियान’
विद्यापीठांचे कुलपती या नात्याने महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये ‘नशामुक्त भारत अभियान’ हाती घेण्यात आले आहे. शैक्षणिक परिसर अमली पदार्थ आणि इतर व्यसनकारक पदार्थांपासून मुक्त ठेवणे हा या अभियानाचा उद्देश आहे. यासाठी विशेष पोर्टल तयार करण्यात आले असून, त्याद्वारे हजारो विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन न करण्याची शपथ घेतली आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, कुटुंबे, नागरी समाज आणि पोलीस यांनी एकत्रितपणे या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविल्यास अमली पदार्थमुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करता येईल. मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची या कार्यक्रमातील उपस्थिती मोठी असून, तरुणांनी या अभियानात सहभागी होऊन समाजात जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रीय एकता आणि अमली पदार्थमुक्त भारताचा संदेश देशभर पोहोचविण्यासाठी या रॅलीचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी महाराष्ट्र पोलीस आणि राज्य राखीव पोलीस बलाचे अभिनंदन करीत रॅलीच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी प्रास्ताविकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर रोजी गुजरातमधील एकतानगर येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीसमोर राष्ट्रीय एकता परेड आयोजित केली जात असल्याचे सांगितले. यावर्षी ‘नशामुक्त भारत’ या संकल्पनेचा प्रसार करण्यासाठी विविध राज्यांतील मोटारसायकलस्वार आपापल्या राजधानीतून या उपक्रमात सहभागी झाले आहेत. विविध शहरे आणि गावांमध्ये जनजागृती करत ही रॅली गुजरातकडे रवाना झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
नक्षलमुक्त भारताच्या निर्मितीसाठी पोलीस दलांनी दिलेल्या योगदानाप्रमाणेच अमली पदार्थांविरोधातील लढ्यातही सर्व पोलीस दलांनी सक्रिय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि इतर राज्यांतील पोलीस पथके नशामुक्त भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग
या कार्यक्रमात के.सी. महाविद्यालय, एच आर महाविद्यालय, सिडनहॅम महाविद्यालय, शासकीय विधी महाविद्यालय, एच.एस.एन. सी. विद्यापीठ, विल्सन महाविद्यालय आणि पुरुषोत्तम हायस्कूल येथील विद्यार्थी सहभागी झाले होते. रोशन शेट्टी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राज्य राखीव पोलीस बलाचे समादेशक संजय जाधव यांनी आभारप्रदर्शन केले.
००००

WhatsApp