अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अंदाजे ९१.०८ टक्के मतदान – महासंवाद

    - Advertisement -

    अमरावती/यवतमाळ, दि. २३ (जिमाका) : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील ८१ मतदान केंद्रांवर शांततेत व निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी जवळपास ९१.०८ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी दिली.

    आज सकाळी ८ वाजता सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदानास सुरुवात झाली. मतदानासाठी विभागातील पाच जिल्ह्यांत ८१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानासाठी वेळ देण्यात आली होती. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या ३५ हजार ८१० असून, त्यापैकी ३२ हजार ६१६ मतदारांनी मतदान केले आहे. जिल्हानिहाय एकूण मतदानाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. अमरावती – १०,०९७ पैकी ९,०२३ (८९.३६ टक्के), अकोला – ५,९४२ पैकी ५,४७४ (९२.१२ टक्के), बुलढाणा – ९,१२४ पैकी ८,२८० (९०.७५ टक्के), वाशिम – ३,७१५ पैकी ३,४५० (९२.८७ टक्के) आणि यवतमाळ – ६,९३२ पैकी ६,३८९ (९२.१७ टक्के) मतदारांनी, म्हणजे एकूण जवळपास ९१.०८ टक्के मतदारांनी, आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची प्राथमिक अंदाजित आकडेवारी समोर आली आहे.

    या निवडणुकीसाठी जिल्हानिहाय एकूण मतदान केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे होती. अमरावती – २५, अकोला – १३, बुलढाणा – १८, वाशिम – ७ आणि यवतमाळ – १८, अशी एकूण ८१ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी उत्साहाने व निर्भय वातावरणात मतदान केले. सर्व केंद्रांवर पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.

    निवडणूक निरीक्षक अभय महाजन आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांनी आज सकाळी अमरावती शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत अपर आयुक्त संजय जाधव आणि इतर अधिकारी उपस्थित होते. मतदान केंद्रांवरील कामकाजाची माहिती घेऊन विभागीय आयुक्तांनी विभागातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केले.

    अमरावती विभागातील मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून विभागीय आयुक्त आणि निवडणूक निरीक्षक मतदान प्रक्रिया संपेपर्यंत लक्ष ठेवून होते. याचप्रमाणे, संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हेही जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवून होते. रात्री उशिरापर्यंत मतपेट्या स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितरीत्या जमा केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.

    या निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अमरावती येथील लोकशाही भवन येथे पार पडणार आहे.

    ००००००

    - Advertisement -