
नाशिक, दि. २३ ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा): पुरेश्या पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. पशुधनाचा पाणी व चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. याकरिता धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढविणे, कालव्यांची गळती रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश राज्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था, मोहाडी, ता. दिंडोरी आणि पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाघाड धरण जलपूजन सोहळा व आयोजित मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे, दिंडोरीच्या नगराध्यक्षा आशा कराटे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, नांदूर मध्यमेश्वरचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवले, वैभव भागवत, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी सुनील पाटील, उपअभियंता संभाजी पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
मंत्री डॉ. विखे-पाटील म्हणाले की, नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रगण्य असून येथील शेतकरी प्रगतिशील आणि प्रयोगशील आहेत. फळबागा, विविध कृषी प्रयोग आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतीच्या विकासासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि पाणी वापर संस्थांची प्रभावी भूमिका महत्त्वाची आहे. वाघाड प्रकल्पातील पाणी वापर संस्थेने केलेले काम उल्लेखनीय असून संस्थेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी पदाधिकारी व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
बंद पाणीवापर संस्था पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांचे कामकाज नियमित ठेवणे, पाणीपट्टीची वसुली करणे आणि संकलित निधीचा उपयोग संबंधित क्षेत्रातील कालव्यांची दुरुस्ती व देखभालीसाठी करणे आवश्यक आहे. पाण्याचा काटेकोर हिशेब आणि उपलब्ध जलसाठ्याचा प्रभावीपणे वापर करून ‘प्रत्येक थेंबाच्या पाण्याचा हिशेब ठेवणे’ ही काळाची गरज आहे. धरणातून सोडण्यात येणारे पाणी, त्याचे वितरण आणि प्रत्यक्ष वापर यावर संबंधित यंत्रणेने लक्ष ठेवावे. पाणी वितरणातील त्रुटी आणि अपव्यय रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य उपयोग झाला, तर उपलब्ध जलसाठ्यातून अधिकाधिक क्षेत्राला लाभ मिळू शकतो.
धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणीसाठवण क्षमतेवर परिणाम होत असल्याचे सांगून मंत्री डॉ विखे पाटील म्हणाले की, राज्यातील जलसाठ्यांची क्षमता टिकविण्यासाठी गाळ काढण्याच्या कामाला महत्त्व द्यावे लागेल. वाघाड धरणातील गाळाचे प्रमाण, गाळ काढल्यानंतर वाढू शकणारी पाणीसाठवण क्षमता आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना यांचा संबंधित विभागाने अभ्यास करावा. गाळ काढण्याच्या कामासाठी शक्य त्या प्रक्रियेनुसार परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. धरणातील गाळ काढल्यास उपलब्ध जलसाठ्याचा अधिक प्रभावी वापर करता येईल आणि सिंचनासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. कालव्यांची दुरुस्ती आणि पाणीगळती रोखणे हे सिंचन व्यवस्थापनातील महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी मुबलक चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने चारा डेपो सुरू करण्यात येणार आहेत. ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल, तेथे आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन, उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन आणि सिंचन व्यवस्थेतील सुधारणा यांच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री डॉ. विखे-पाटील यांनी सांगितले.
मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की, वाघाड धरणातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी. धरणातील पाणीसाठ्याची क्षमता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, तसेच धरणाच्या विकासासाठी कृती समिती स्थापन करावी. तसेच वाघाड धरणाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने धरणातील गाळ काढणे, पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि आवश्यक विकासकामांचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक कार्यवाही करावी, असेही मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले. वाघाड धरण परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटकांच्या सोयीसाठी विश्रामगृह उभारण्याबाबतही नियोजन करावे. धरणाचा जलसाठा वाढविण्यासोबतच पर्यटन विकासाच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी संबंधित विभागांनी प्रस्तावित कामांचा पाठपुरावा करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
खासदार श्री. भगरे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता श्री. गोवर्धन यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली
००००

WhatsApp