
- शेतकरी जीवन, जलसंवर्धन, विज्ञान, संविधान आणि स्त्रीसक्षमीकरणाचा वर्षभर जागर
धुळे, दि. २३ ऑक्टोबर २०२६ (जिमाका वृत्त): महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्माला 2027 मध्ये 200 वर्षे पूर्ण होत असल्याने, 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत साजऱ्या होत असलेल्या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त धुळे जिल्ह्यातील शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महात्मा फुले यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी दिलेला लढा, सामाजिक समतेचा विचार आणि परिवर्तनाची प्रेरणा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तकांतील धड्यांपासून प्रत्यक्ष सामाजिक कृतीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केलेल्या कृती आराखड्यानुसार, धुळे जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या आणि सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांचा उद्देश केवळ महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देणे एवढाच नसून, समता, स्वाभिमान, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक न्याय आणि सामाजिक जबाबदारीची मूल्ये त्यांच्या आचरणात रुजविणे हा आहे.
वाचन, संवाद आणि सर्जनशील उपक्रमांवर भर
महात्मा फुले यांचे विचार पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना ते अनुभवता यावेत, यासाठी वाचन, संवाद आणि सर्जनशील उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी फुले यांच्या कार्याविषयी नियमित वाचन करावे, अशी अपेक्षा आहे. शाळांमधील वाचनालयांचा प्रभावी वापर, फुले साहित्याचे वाचन, व्याख्याने, चर्चासत्रे आणि ऑनलाइन परिसंवाद यांना प्राधान्य दिले जात आहे.
महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग पथनाट्य, एकपात्री प्रयोग, भूमिकाभिनय आणि चित्रकलेच्या माध्यमातून सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत आहे. यामुळे इतिहासातील घटना समजून घेताना त्यामागील सामाजिक संघर्ष आणि परिवर्तनाची प्रेरणाही विद्यार्थ्यांना जाणवेल.
जलसंवर्धन आणि पर्यावरणसंवर्धनाची जाणीव
शेतकरी, शेती आणि पाण्याचे प्रश्न धुळे जिल्ह्याच्या सामाजिक व आर्थिक जीवनाशी निगडित आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांच्या शेतकरीविषयक विचारांशी संबंधित जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाचे उपक्रम जिल्ह्यासाठी विशेष महत्त्वाचे ठरत आहेत.
कृती आराखड्यात जलसंवर्धन अभियान, वृक्षारोपण, शाळा स्वच्छता आणि पर्यावरणविषयक जनजागृतीचा समावेश आहे. पाण्याचे महत्त्व, त्याचा काटकसरीने वापर, शेती आणि पाण्याचे नाते तसेच पर्यावरणसंवर्धनाची गरज विद्यार्थ्यांना समजावून सांगितली जात आहे. दुष्काळी परिस्थितीचा अनुभव असलेल्या धुळे जिल्ह्यात हे उपक्रम शाळांपुरते मर्यादित न राहता समाजातही जल आणि पर्यावरणसंवर्धनाची जाणीव निर्माण करू शकतात.
समतेचा संदेश गावागावांत पोहोचणार
महात्मा फुले यांनी सामाजिक विषमतेविरुद्ध केलेल्या संघर्षाची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी ‘समता भिंत’, ‘समता दौड’, समताकथा, ग्रामभेटी आणि संदेशलेखन यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत.
ग्रामीण आणि शहरी भागांतील विद्यार्थी या माध्यमातून सामाजिक समतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवत आहेत. जातीभेद, अंधश्रद्धा आणि विषमता दूर करून माणुसकी, बंधुता आणि समान संधींचे महत्त्व अधोरेखित करण्यावर भर राहणार आहे.
सावित्रीबाईंच्या कार्यातून मुलींना प्रेरणा
मुलींच्या शिक्षणासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेला संघर्ष हा भारतीय समाजपरिवर्तनाच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा आहे. या कार्याची ओळख करून देण्यासाठी स्त्रीसक्षमीकरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या मुलाखती, नाटिका, पोस्टर स्पर्धा, पुस्तकप्रदर्शन आणि ‘महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह’ यांसारखे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत.
विशेषतः ग्रामीण भागातील मुलींमध्ये शिक्षणाविषयी आत्मविश्वास निर्माण करणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि स्त्री-पुरुष समानतेची जाणीव वाढविणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे. मुलींच्या शिक्षणासाठी उभ्या राहिलेल्या ऐतिहासिक चळवळीचा संबंध विद्यार्थिनींना त्यांच्या वर्तमान आणि भविष्यातील प्रगतीशी जोडता येणार आहे.
संविधान, लोकशाही आणि नेतृत्वाचे धडे
विद्यार्थ्यांना लोकशाही आणि संविधानाचा अनुभवाधारित परिचय करून देण्यासाठी संविधानविषयक पुस्तकांचे वाचन, अभिरूप ग्रामपंचायत व जिल्हा परिषद, जनजागृती रॅली आणि पोवाडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. या माध्यमातून नागरिकत्व, लोकशाही व्यवस्था, निर्णयप्रक्रिया आणि सामाजिक जबाबदारी यांची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली जात आहे.
यासोबतच विज्ञान उपक्रम, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर, नवोपक्रम स्पर्धा आणि प्रकल्प सादरीकरणातून विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला आणि सर्जनशीलतेला चालना दिली जात आहे.
प्रत्येक महिन्याला वेगळा विषय
द्विजन्मशताब्दी वर्षाच्या कृती आराखड्यात प्रत्येक महिन्यासाठी स्वतंत्र विषय निश्चित करण्यात आला आहे. एप्रिल 2026 मध्ये फुले विचार जनजागृती, मे 2026 मध्ये वाचन व संवाद, जूनमध्ये जलसंवर्धन व पर्यावरण, जुलैमध्ये सामाजिक समता, ऑगस्टमध्ये समाजसेवा व राष्ट्रभावना, सप्टेंबरमध्ये नवोपक्रम व शिक्षकसन्मान, तर ऑक्टोबरमध्ये स्त्रीसक्षमीकरणावर आधारित उपक्रम राबविण्यात येत आहेत.
नोव्हेंबरमध्ये नेतृत्व व नागरिकत्व, डिसेंबरमध्ये सांस्कृतिक विकास, जानेवारी 2027 मध्ये संशोधन व स्थानिक इतिहासाचा अभ्यास, फेब्रुवारीमध्ये वादविवाद, निबंध व प्रकल्प स्पर्धा, मार्चमध्ये वर्षभरातील उपक्रमांचा आढावा व समारोप, तर 1 ते 10 एप्रिल 2027 या कालावधीत द्विजन्मशताब्दी वर्षाचा समारोप आणि पुरस्कार वितरणाचे नियोजन आहे. ‘फुले समता पुरस्कार’ तसेच सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि शिक्षकांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.
#Phule200 द्वारे डिजिटल व्यासपीठ
विद्यार्थ्यांनी राबविलेल्या उपक्रमांचे फोटो, व्हिडिओ आणि साहित्य #Phule200 या हॅशटॅगसह डिजिटल माध्यमांवर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची पथनाट्ये, चित्रे, लेखन, प्रकल्प आणि इतर सर्जनशील उपक्रम व्यापक स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.
‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत संबंधित कृती कार्यक्रमांचे आयोजन सर्व शाळांसाठी अनिवार्य राहणार असून, विद्यार्थ्यांचा सहभाग ऐच्छिक असेल. म्हणजेच प्रत्येक शाळेने संबंधित उपक्रमांचे आयोजन करणे आवश्यक आहे; मात्र त्या उपक्रमांमध्ये सहभागी होणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक राहणार नाही. उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून दरमहा आढावा घेण्यात येणार आहे.
विचारांचा उत्सव ठरणार द्विजन्मशताब्दी वर्ष
महात्मा फुले यांची द्विजन्मशताब्दी ही केवळ त्यांच्या कार्याचे स्मरण करण्याची संधी नसून, त्यांच्या विचारांचा आजच्या सामाजिक वास्तवाशी संबंध जोडण्याचा प्रसंग आहे. शिक्षण, शेतकरी कल्याण, स्त्रीसक्षमीकरण, सामाजिक न्याय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे त्यांच्या विचारविश्वातील विषय आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.
धुळे जिल्ह्यातील शाळांमधून हे विचार विद्यार्थ्यांच्या कृतीत उतरले, तर शिक्षणाचा समाजजीवनाशी अधिक दृढ संबंध निर्माण होईल. महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेले शिक्षण केवळ अक्षरज्ञान देणारे नव्हते; ते विचार करण्याची क्षमता निर्माण करणारे, अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे बळ देणारे आणि समाजपरिवर्तनाची दिशा दाखविणारे होते.
द्विजन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हाच परिवर्तनशील विचार 10 एप्रिल 2027 पर्यंत धुळे जिल्ह्यातील नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
००००