
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष तथा राष्ट्रकुल संसदीय मंडळ (सीपीए), महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सह-अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांची कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी समितीवर भारत सी.पी.ए. विभागाचे प्रतिनिधी म्हणून नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र विधिमंडळ आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेसाठी ही अत्यंत प्रतिष्ठेची व अभिमानास्पद बाब आहे. या नियुक्तीबद्दल त्यांचे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेचे पदसिद्ध सह-अध्यक्ष प्रा. राम शिंदे, उप सभापती सचिन अहिर, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी अभिनंदन केले.
कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन, हाऊसेस ऑफ पार्लमेंट, लंडन मुख्यालय उपमहासचिव जार्विस मातिया यांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे ॲड. राहुल नार्वेकर यांचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी समितीवर सदस्यपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल अभिनंदन आणि स्वागत केले आहे. केपटाऊन येथे गेल्याच महिन्यात झालेल्या राष्ट्रकुल संसदीय मंडळ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी भारत विभागाचे कार्यकारी समितीवरील प्रतिनिधी म्हणून त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले होते.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ, मुख्यालय लंडन ही राष्ट्रकुलातील देशांमधील संसद, विधिमंडळांमध्ये सहकार्य, लोकशाही मूल्यांचे संवर्धन, संसदीय कार्यपद्धतींची देवाणघेवाण आणि सुशासन यांना प्रोत्साहन देणारी महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय संस्था आहे. या संस्थेच्या कार्यकारी समितीवर भारत विभागाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना मिळालेली संधी ही महाराष्ट्र विधिमंडळाला लाभलेली संसदीय परंपरा आणि योगदानाच्या दृष्टीने महत्वाची घटना आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखा ही देशातील सर्वप्रथम स्थापित संस्था आहे.
या नियुक्तीमुळे महाराष्ट्र विधिमंडळाला राष्ट्रकुलातील विविध देशांच्या प्रतिनिधीगृहांशी संवाद साधण्याची, संसदीय कामकाजातील उत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची तसेच लोकशाही संस्था अधिक सक्षम करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्यावतीने जागतिक संसदीय सहकार्याच्या क्षेत्रात अधिक प्रभावी सहभाग नोंदविण्याच्या दृष्टीनेही ही नियुक्ती महत्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यकारी समितीच्या प्रतिनिधींची ५ नोव्हेंबर रोजी बैठक
राष्ट्रकुल संसदीय मंडळ कार्यकारी समितीतील विभागीय प्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांसाठी गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता (जीएमटी) परिचयात्मक बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कार्यकारी समितीसदस्यांच्या भूमिका व जबाबदाऱ्या, तसेच संस्थेची प्रशासकीय आणि संस्थात्मक कार्यचौकट याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आगामी २०२७ च्या मध्य-वर्षीय बैठकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनेही ही बैठक महत्वाची ठरणार आहे
०००००

WhatsApp