
भारतीय संस्कृती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या विचारांचा महान वारसा लाभलेला गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सोहळा नसून सामाजिक प्रबोधन, विचारांचे आदानप्रदान आणि जनसामान्यांच्या अभूतपूर्व एकोप्याचे एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. याच लोकोत्साहाचा सकारात्मक आणि रचनात्मक उपयोग करत सामान्य नागरिकांच्या दारापर्यंत विविध शासकीय योजना आणि लोककल्याणकारी सेवा थेट पोहोचवण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने यंदाच्या उत्सवात ‘लोकसंवाद-२०२६’ हा अत्यंत नाविन्यपूर्ण आणि पथदर्शी उपक्रम हाती घेतला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा व तालुकास्तरीय सर्व शासकीय विभागांच्या सक्रिय समन्वयाने हा महा-उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात अत्यंत व्यापक, नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आला.
गणेशोत्सवादरम्यान भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी मंडपांमध्ये एकत्र येत असतात. या जनसागराचा व उत्सवी वातावरणाचा सुवर्णयोग साधून थेट जनतेशी सुसंवाद प्रस्थापित करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी जिल्ह्यातील प्रमुख, मानाच्या तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांमध्ये स्वतः उपस्थित राहिले आणि त्यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर व अत्यंत सुलभ भाषेत माहिती दिली. प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी एकाच वेळी प्रमुख योजनांचे सादरीकरण करून जनतेचे प्रबोधन करण्यात आले. प्रशासकीय पारदर्शकता आणि गतिमानतेचा आदर्श प्रस्थापित करणारी ही मोहीम शासकीय यंत्रणा आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यातील दुवा अधिक घट्ट करणारी ठरली आहे.
या उपक्रमाला जिल्ह्यातील नामांकित गणेशोत्सव मंडळांनी दिलेला प्रतिसाद अत्यंत कौतुकास्पद आणि प्रेरणादायी असाच होता. अलिबाग राजा गणेशोत्सव मंडळ, बिव्हळचाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकसंवाद कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. सूक्ष्म व लघु उद्योगांना चालना देऊन युवकांना स्थानिक पातळीवर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना कशी मैलाचा दगड ठरत आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला. उत्पादन उद्योगासाठी १ कोटी रुपयांपर्यंत तर सेवा व कृषीपूरक व्यवसायांसाठी ५० लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना मिळणारे प्रोत्साहन व अनुदान याबाबत तरुण-तरुणींना मार्गदर्शन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष महेश कोटीयन यांच्यासह स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले.
तसेच, आदर्श मित्र मंडळ, घरत आळी, अलिबाग येथील सार्वजनिक गणेशोत्सवातही लोकसंवाद उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने “रोजगार महाकुंभ महाराष्ट्र” या अभियानाची माहिती देण्यात आली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने संपूर्ण राज्यात आयोजित या महा-उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्यात अंजुमन आय इस्लाम काळसेकर टेक्निकल कॅम्पस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, आयटीएम कौशल्य विद्यापीठ खारघर यांसारख्या जिल्ह्यातील १२ प्रमुख ठिकाणी भव्य रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो सुशिक्षित तरुणांना रोजगाराची प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष रविकिरण आंबेकर यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी या माहितीचा प्रत्यक्ष लाभ घेतला.
या लोकसंवाद अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली विविध लोकोपयोगी योजनांची सखोल माहिती मिळाली. महसूल विभागातील फेरफार, ऑनलाईन दाखले, ‘सेवा संकल्प’, नागरी सुविधा, पर्यावरण संवर्धन, विविध शैक्षणिक शिष्यवृत्ती, सामाजिक न्याय व क्रीडा विभागाच्या योजना, ‘श्री गणेशा आरोग्याचा’ मोहीम आणि गंभीर रुग्णांना संजीवनी देणारा ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष’ यांसारख्या संवेदनशील योजनांचा यात समावेश होता. यासोबतच, वाढत्या डिजिटल युगात सायबर सुरक्षा, दैनंदिन सुरक्षित डिजिटल व्यवहार, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि महिला व बालविकास विभागाच्या उपक्रमांची माहिती देऊन नागरिकांना अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महाराष्ट्राच्या या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा सन्मान करत शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या विविध परंपरा, श्रद्धा व वैशिष्ट्यांना जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी ‘Bappa.org’ हा अधिकृत डिजिटल मंच उपलब्ध करून देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला लाभलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा, ग्रामीण व दुर्गम भागातील वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक प्रथा, आरत्या, नैवेद्य आणि उत्सवाच्या आठवणी या डिजिटल मंचावर जतन करण्याचे आवाहनही या प्रसंगी करण्यात आले.
हा भव्य आणि मैलाचा दगड ठरलेला उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन व निरंतर प्रोत्साहन, मार्गदर्शक दिशा देणारे माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह सर, संचालक किशोर गांगुर्डे, गोविंद अहंकारी, कोकण विभागाच्या उपसंचालक संजू चव्हाण तसेच रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल, अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्या कुशल नेतृत्वामुळेच हे अभियान अत्यंत सुसज्जपणे पार पडले.
त्याचप्रमाणे प्रत्यक्ष गणेश मंडपांमध्ये उतरून नागरिकांना योजनांचे धडे देणारे सर्व शासकीय विभागांचे अधिकारी-कर्मचारी, जिल्हा माहिती कार्यालयातील सर्व कर्मचारी, गणेश मंडळांचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक आणि ज्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या अभियानाला खरा अर्थ प्राप्त झाला ते सर्व नागरिक यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे.
कोणत्याही लोककल्याणकारी मोहिमेचा संदेश घराघरांत पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असते. या दृष्टीने “लोकसंवाद २०२६” ला प्रसारमाध्यमांची अतिशय भक्कम साथ लाभली. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांनी या अभियानाला दिलेली भरघोस प्रसिद्धी ही उपक्रमाची व्याप्ती वाढवणारी ठरली.
या संपूर्ण मोहिमेची सूत्रे कुशलतेने सांभाळणारे माझे सहकारी विठ्ठल बेंदुगडे, निशा कदम, राजश्री वाडेकर, जयंत ठाकूर, प्रफुल्ल पाटील आणि प्रसाद ठाकूर यांच्यासह ‘टीम रायगड/ठाणे’ (TEAM RAIGAD THANE) च्या अहोरात्र परिश्रमामुळे हा संवाद अत्यंत प्रभावी ठरला. या सर्व घटकांचे जिल्हा माहिती कार्यालय, रायगड यांच्या वतीने अत्यंत मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.
एकंदरीत, रायगड जिल्ह्यात राबविण्यात आलेला हा ‘लोकसंवाद-२०२६’ महा-उपक्रम शासकीय यंत्रणा आणि जनसामान्य यांच्यातील सुसंवादाचे एक सोनेरी पान ठरला आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि गणेशोत्सव मंडळांनी दाखवलेली तत्परता यामुळे हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘जनकल्याण पर्व’ म्हणून यशस्वी झाला असून, प्रशासकीय गतिमानता व सामाजिक कटिबद्धतेचा एक नवा आदर्श रायगड जिल्ह्याने राज्यासमोर ठेवला आहे.
मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी,
रायगड-अलिबाग
००००