सुरीनामच्या भारतातील राजदूत हनीषा जयराम यांची महाराष्ट्र विधिमंडळाला सदिच्छा भेट – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २२ : सुरीनामच्या भारतातील राजदूत हनीषा जयराम यांनी महाराष्ट्र विधिमंडळ, मुंबई येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी त्यांचे स्वागत केले.

    सुरीनाममध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या लक्षणीय असून, दोन्ही देशांमधील राजनैतिक, आर्थिक आणि व्यापारविषयक संबंध अतिशय दृढ व मैत्रीपूर्ण आहेत. सुरीनाममध्ये ५१ प्रतिनिधींचे सभागृह असून, मंत्रिमंडळ सदस्यांची संख्या १७ आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे विविध क्षेत्रांतील व्यापार आणखी वाढविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे हनीषा जयराम यांनी यावेळी सांगितले.

    त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांना भेट दिली. दोन्ही देशांमधील व्यापार आणि मैत्रीपूर्ण संबंध आणखी वृद्धिंगत व्हावेत, अशी सदिच्छा उपसभापती सचिन अहिर यांनी यावेळी व्यक्त केली.

    याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाच्या सचिव-२ श्रीमती मेघना तळेकर-इटकेलवार, सचिव-३ डॉ. विलास आठवले, सचिव-४ श्री. शिवदर्शन साठ्ये आणि महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभापतींचे सचिव पंडित खेडकर उपस्थित होते.

    ००००

    (निलेश मदाने)

    मा. सभापती, महाराष्ट्र विधानपरिषद यांचे जनसंपर्क अधिकारी

    - Advertisement -