बृहन्मुंबई हद्दीत २५ ऑक्टोबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २२ : बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील अधिकारांनुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे.

    या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमणे, मिरवणूक काढणे,जमाव करून ध्वनिवर्धक किंवा सांगीतिक बँडचा वापर करणे तसेच फटाके फोडणे यांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. विवाह समारंभ व विवाह प्रथेशी संबंधित अन्य समारंभ, अंत्यविधी, कंपन्या, सहकारी संस्था तसेच अन्य संस्था व संघटनांच्या कायदेशीर बैठका, क्लबमध्ये होणारे कार्यक्रम, सामाजिक मेळावे आणि सहकारी संस्था व अन्य संस्थांच्या नियमित कामकाजाचा भाग म्हणून आयोजित करण्यात येणारे कार्यक्रम यांना या जमावबंदी आदेशातून वगळण्यात आले आहे.

    चित्रपटगृहे, नाट्यगृहे तसेच सार्वजनिक मनोरंजनाची अन्य ठिकाणे, न्यायालये, शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये व अन्य शैक्षणिक संस्था, कंपन्या, कारखाने, दुकाने तसेच अन्य आस्थापनांमध्ये नियमित व्यापार व व्यवसायाच्या अनुषंगाने होणाऱ्या जमावांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. तसेच, शांततापूर्ण मार्गाने काढण्यात येणाऱ्या मोर्चास पोलिसांनी परवानगी दिली असल्यास, त्या मोर्चालाही या जमावबंदी आदेशातून वगळण्यात आले आहे, असे पोलीस उपआयुक्त (अभियान) अकबर पठाण यांनी आदेशाद्वारे कळविले आहे.

    ०००

    निलेश तायडे/विसंअ

    - Advertisement -