रायगड-अलिबाग दि. ७ (जिमाका)-पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवडीसारख्या शाश्वत पर्यायांचा स्वीकार केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न निश्चितपणे वाढू शकते. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी आंबा, काजू यांसारख्या फळपिकांची लागवड करावी. कृषी व फलोत्पादन विभाग शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केले.
मौजे विन्हेरे येथे किशोर नारायण फाळके यांच्या शेतावर ‘मागेल त्याला काजू’ योजनेअंतर्गत 0.20 हेक्टर क्षेत्रावर सीआरए तंत्रज्ञानाचा वापर करून काजू लागवडीचा, तर मौजे नातोंडी येथे ज्ञानेश्वर सोनकर यांच्या शेतावर व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत 0.25 हेक्टर क्षेत्रावर आंबा घन लागवडीचा शुभारंभ रोजगार हमी मंत्री श्री. गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीलेश ताठरे, पंचायत समिती सभापती श्रीमती सावंत, पंचायत समिती सदस्य श्री. खिडबिडे, श्रीमती म. माने, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. खटकळे, तहसीलदार श्री. शितोळे, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. गोगावले म्हणाले की, अनेक ठिकाणी शेती पडिक राहत असल्याचे दिसून येत आहे. अशा जमिनीवर फळबाग लागवड करून शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करावेत. व्हीजीबी-आरएएमजी योजनेअंतर्गत आंबा घन लागवडीसाठी 100 झाडांपर्यंत सुमारे 70 हजार रुपयांचे अनुदान तीन वर्षांच्या कालावधीत दिले जात आहे. या योजनेचा लाभ घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने फळबाग विकसित करावी. कृषी विभाग, फलोत्पादन विभाग आणि संबंधित सर्व यंत्रणा शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासह आवश्यक ते सर्व सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, शासनाची ‘मागेल त्याला काजू’ ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. काजू हे दीर्घकाळ शाश्वत उत्पन्न देणारे पीक असून त्याचे नुकसान जनावरांकडून तुलनेने कमी होते. या योजनेअंतर्गतही शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन काजू लागवड करावी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. फळबाग लागवड ही भविष्यातील शेतीसाठी महत्त्वाची दिशा असून या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
000000






















WhatsApp