
नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक महानगरपालिका हद्दीतील बंद असलेल्या शाळांची आवश्यक दुरुस्ती व पायाभूत सुविधांसह पुनरुज्जीवन करून पुन्हा सुरू कराव्यात. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, स्वच्छ व सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण निर्माण करून विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रभावी नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.
मंत्री भुसे यांनी आज नाशिक शहरातील पंचवटी येथील मनपा प्राथमिक शाळा क्र. ३०, सिडको येथील मनपा माध्यमिक शाळा तसेच जेलरोड येथील मनपा शाळा क्र. ५६ येथे भेट देऊन शाळांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सूचना दिल्या. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, अजय बोरस्ते, प्रविण तिदमे यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री दादाजी भुसे यांनी शाळांमधील उपलब्ध शैक्षणिक सुविधा, वर्गखोल्या, इमारतींची सद्यस्थिती, पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीचा आढावा घेतला. महानगरपालिका हद्दीतील सध्या बंद असलेल्या सर्व शाळांची सद्यस्थिती तपासून त्यांचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करावे. ज्या शाळांच्या इमारती अथवा परिसरात दुरुस्तीची आवश्यकता आहे, तेथील कामे प्राधान्याने व तातडीने पूर्ण करावीत. शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, सुरक्षितता, वर्गखोल्या तसेच विद्यार्थ्यांसाठी आवश्यक इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मंत्री भुसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच शाळांच्या इमारती व परिसर विद्यार्थ्यांना आकर्षित करतील, यासाठी आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे. शाळांमध्ये सकारात्मक व आनंददायी वातावरण निर्माण झाल्यास पालकांचा मनपा शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होण्यास मदत होईल. त्यामुळे बंद शाळा पुन्हा सुरू करण्यासोबतच तेथील विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.
शाळांच्या पाहणीदरम्यान उपलब्ध शैक्षणिक साधने, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तसेच आवश्यक असलेल्या सुधारणा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. ज्या ठिकाणी आवश्यक कामे प्रलंबित आहेत, ती कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
000000

WhatsApp