Home शहरे अमरावती बुलडाणा जिल्ह्यात कोरोनावर मात करीत काल तीन रूग्ण बरे होवून परतले घरी..!

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनावर मात करीत काल तीन रूग्ण बरे होवून परतले घरी..!

0

दिनांक 23 एप्रिल 20 रोजी शेगांव येथील दोन व चितोडा ता. खामगांव येथील एका रूग्णांचा समावेश
· टाळ्यांच्या गजरात रुग्णांचे स्वागत
· आतापर्यंत 11 कोरोना बाधीत झाले बरे

बुलडाणा : कोरेाना विषाणू संपूर्ण जग आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यातही हळूहळू पाय पसरविणाऱ्या कोरोनाने चांगलीच खळबळ उडवून दिली होती. जिल्ह्यात सात तालुक्यांमध्ये आपली उपस्थिती दर्शवित कोरोनाने प्रशासनाला गंभीर केले. कन्टेटमेंट प्लॅन, लॉकडाऊन, गर्दी कमी करण्यासाठी विविध योजलेले उपाय यामुळे कोरोना नियंत्रणात येत आहे. जिल्ह्यात आज 23 एप्रिल रोजी कोरोनावर मात करीत तीन रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.
जिल्ह्यात चिखली येथे तीन, चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन, सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे सहा कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील चार, शेगांव येथील एक, चितोडा ता. खामगांव येथील एक, चिखली येथील एक आणि दे.राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये आज तीन रूग्णांची भर पडली आहे. आज शेगांव येथील दोन आणि चितोडा ता. खामगांव येथील एक अशाप्रकारे तीन रूग्ण बरे होवून स्वगृही परतले आहेत. अशाप्रकारे एकूण 11 रूग्ण बरे झालेले आहे.
प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीन रूग्णांचे दुसरे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार उपचारादरम्यान संबंधित रुग्णांचे दाखल केल्यापासून 14 व 15 दिवसानंतरचे दोन्ही अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन्ही तपासणी अहवाल निगेटीव्ह आल्याने चितोडा ता. खामगांव व शेगांव येथील रुग्णांना डिस्जार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यावर उपचार करणारे सिस्टर्स व ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवित त्यांना प्रोत्साहित केले. कोरोनावर मात केल्याने रूग्णांचे चेहरेही आनंदाने फुलले होते. समाधानाचे हास्य रूग्णांच्या चेहऱ्यावर होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पंडीत यांनी डिस्चार्ज पेपर दिला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. या तीन रूग्णांमुळे जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 11 झाली आहे. जिल्ह्यात कोविड -19 आजाराने 21 रूग्ण बाधीत होते. त्यापैकी एकाचा 28 मार्च रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर 17 एप्रिल रोजी तीन, 20 एप्रिल रोजी पाच आणि आज 3 रूग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. आता 9 रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या कोरोनाबाधीत रूगांना तपासणी अहवालानंतर कोरोना संसर्ग वार्डात दाखल करुन या सर्वांवर उपचार करण्यात आले. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या रुग्णांवर तसेच जिल्ह्यात संशयित आढळून येणाऱ्या रुग्णांवर शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात तपासणी, उपचार करण्यात आले. कोरोना बाधित आढळलेल्या या व्यक्तींचे दोन्ही स्वॅब घेवून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पहिला व दुसरा तपासणी रिपोर्ट निगेटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला. दोन्ही अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सदर बाधीत रूग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले.
कोरोनाच्या या जीवघेण्या आजारातून वाचलेल्या सर्व कोरोना निगेटीव्ह रूग्णांचे चेहरे आनंदीत होते. सर्व मनोमन आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस यांचे आभार मानत होते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अजूनही लॉकडाऊनचे पालन करावे, घरातून विनाकारण बाहेर पडू नये. सर्वांनी मास्क किंवा स्वच्छ हात रूमाल चेहऱ्यावर ठेवावा. अनावश्यक बाहेर न पडता घरातच रहावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.