Home शहरे नाशिक बेकायदा होर्डिंग प्रकरणी 4 नगरसेवकांवर गुन्हा दाखल केल्यानं पालिका अधिकारी निलंबित

बेकायदा होर्डिंग प्रकरणी 4 नगरसेवकांवर गुन्हा दाखल केल्यानं पालिका अधिकारी निलंबित

नाशिक: बेकायदा होर्डिंग लावल्याने चार नगरसेवकांवर थेट गुन्हा दाखल करणाऱ्या महानगरपालिकेतील विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्यावर निलंबनाची कारवाई आज महासभेत करण्यात आली आहे.

ईदच्या दिवशी भाजप नगरसेवक सतीश कुलकर्णी यांच्यासह चार नगरसेवकांच्या नावाने होर्डिंग्ज लावले होते. त्यावर धारणकर यांनी चारही नगरसेवकांवर गुन्हा दाखल केले होते. शहरात अनेक होर्डिंग्ज बेकायदा लावले जात असताना केवळ याच नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली. त्यातही संबंधित नगरसेवक हे नाशकात नव्हते. त्यातील एका नगरसेविकाच्या आईचा मृत्यू झाला होता. मात्र तरीही याच नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हणत महापौरांनी विभागीय अधिकारी रवींद्र धारणकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

धारणकरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी सभागृहात गोंधळ घातला. लोकप्रतिनिधींच्या दबावानंतर महापौरांनी धारणकरांच्या निलंबनाचे आदेश दिले. यानंतर महापौरांनी धारणकरांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले. यामुळे बेकायदा होर्डिंग लावणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करायचीच नाही का, लोकप्रतिनिधींना कायदा लागू होत नाही का, असे प्रश्न नाशिककर उपस्थित करत आहेत.