भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्रालयात संपन्न – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २१: भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र प्रादेशिक शाखेची ७१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्रालयातील परिषद सभागृहात माजी मुख्य सचिव तथा मानद अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सचिव डॉ. विजय सतबीर सिंग, खजिनदार विकास वि. देवधर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

    अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांनी संस्थेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात केलेल्या ठळक कामांची माहिती दिली. संस्थेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना राज्यव्यापी व सामाजिक स्वरूप देण्याचे कार्य संस्थेमार्फत केले जाते. २०२५-२६ च्या ‘कै.श्री. बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा’ तसेच ‘कै. डॉ. एस. एस. गडकरी वार्षिक स्मृती पुरस्कार’ – सार्वजनिक प्रशासनातील नाविन्यपूर्ण कार्यासाठी’ या पुरस्कारांची घोषणा अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांनी केली.

    मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे उपस्थित राहून पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

    भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत  २०२६-२०२८ साठी चार कार्यकारी समिती सदस्यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यामध्ये गोविंद स्वरूप, भा.प्र.से. (निवृत्त), सत्यबीर दड्ड, भा.प्र.से. (निवृत्त), अश्विनी भिडे, भा.प्र.से. आणि डॉ. प्रकाश कोंडेकर यांचा समावेश आहे.

    भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या उद्दिष्टानुसार नाविन्यपूर्ण उपक्रमांतून विद्यार्थी व महाविद्यालयांशी संपर्क वाढविणे, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मार्गदर्शनासाठी या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीची निवड करून या संदर्भातील व्याख्यानाचे आयोजन करण्याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. २०२५-२६ चा वार्षिक तसेच लेखा अहवाल सभेत मांडण्यात आला. प्रारंभी दिवंगत सदस्य गोपालचंद्र त्रिपाठी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

    भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला ‘कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक मराठी निबंध स्पर्धे’तील विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग’ या विषयावरील निबंधासाठी प्रथम क्रमांक ॲड्. प्रतिभा सुधीर पोतदार, कर्जत, रायगड यांना, ‘सोशल मीडियासमोरील आव्हाने आणि संधी’ या विषयावरील निबंधासाठी द्वितीय क्रमांक प्रा. राजेंद्र मधुसूदन ठोंबरे, सांगोला यांना, तर तृतीय क्रमांक कु. योगंधरा बधें, पुणे यांना जाहीर करण्यात आला. उत्तेजनार्थ पारितोषिक डॉ. शिल्पा जोशी, छत्रपती संभाजीनगर यांना जाहीर करण्यात आले. यांपैकी उपस्थित विजेत्यांना अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.

    नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओंकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी (नाशिक) यांना ‘कै. डॉ. एस. एस. गडकरी स्मृती पुरस्कार’

    विधवा, परित्यक्ता महिला तसेच कुपोषित बालकांच्या कल्याणासाठी जिल्हास्तरावर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ओंकार पवार यांनी राबविलेल्या दोन नाविन्यपूर्ण प्रशासकीय उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिला तसेच प्रौढ अविवाहित महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरावर ‘नवचेतना अभियान’ राबविण्यात येत असून, हे पहिले व्यापक पुनर्वसन अभियान आहे.

    पोषण दूत योजने’अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील प्रत्येक वर्ग-१ व वर्ग-२ अधिकाऱ्याने एका तीव्र कुपोषित बालकाची वैयक्तिकरित्या जबाबदारी स्वीकारणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकारी दरमहा बालकाची भेट घेऊन त्याचे वजन तपासणे, आवश्यक औषधोपचार व इतर सुविधा मिळत असल्याची खात्री करणे, तसेच येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्याचे काम करतात.

    ००००

    योगेश मोरे/उपसंपादक

    - Advertisement -