भिवंडीत क्षुल्लक कारणावरुन मित्रावर जीवघेणा हल्ला

- Advertisement -

भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्राचा काटा काढला आहे. मित्राच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार करुन त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना काल रात्री वेहळे येथील दादोबा चौक येथे घडली. जखमी तरुणावर ठाण्याच्या टायटन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

अशी घडली घटना

रोशन बाळकृष्ण चव्हाण (१७ वर्ष) आणि आशिष रमन थळे (१८ वर्ष) हे दोघे मित्र आहे. दोघेही सध्या १२ वीमध्ये शिकतात. रोशन आणि आशिषमध्ये शुल्लक कारणावरुन वाद झाला. यात रागाच्या भरामध्ये आशिषने रोशनच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यामध्ये रोशन गंभीर जखमी झाला आणि तो बेशुध्द पडला. आसपासच्या नागरिकांनी त्याला ताबडतोब माणकोली नाका येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला उपचारासाठी ठाण्याला हलवले.

फरार आरोपीचा शोध सुरु

दरम्यान या हल्ल्यामध्ये रोशनच्या डोक्याची कवटी फुटली. त्याच्यावर ठाण्याच्या टायटन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याच्यावर या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या हल्ल्याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आशिष थळे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर आशिष थळे हा फरार झाला आहे. पोलिसांकडून आशिषचा शोध सुरु आहे.

- Advertisement -