Home शहरे पुणे मकरंद कुलकर्णीला १७ ऑगस्टपर्यंत कोठडी

मकरंद कुलकर्णीला १७ ऑगस्टपर्यंत कोठडी

0

पुणे : गुंतवणूकदारांना कोटयावधींचा गंडा घातल्याप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचा भाऊ मकरंद कुलकर्णीला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने काल मुंबई विमानतळावरून ताब्यात घेऊन बुधवारी दुपारी न्यायालयात हजर केले. शेतकर्‍यांकडून कमी पैशात जमीन विकत घेऊन ती डीएसके यांचे कंपनीस चढया दराने विकून १८४ कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी दिले आहेत.

मकरंद सखाराम कुलकर्णी (वय ६६, रा. नवसह्याद्री सोसायटी, कर्वेनगर) असे पोलिस कोठडी झालेल्याचे नाव आहे. याबाबत जितेंद्र नारायण मुळेकर (वय ६५, रा. गुरूगणेशनगरजवळ, कोथरूड) यांनी फिर्याद दिली होती. हा गुन्हा १७ सप्टेंबर २०१७ पासून घडला आहे.  

गुन्ह्याचा तपासात आणि फॉरेन्सीक ऑडिटच्या अहवालानुसार सुमारे ३५ हजार एफडी गुंतवणुकदारांची व अनसिक्युअर्ड लोन धारकांचा विश्वासघात करून तब्बल १ हजार ८३ कोटी ७  लाखांच्या रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. बँकेकडून घेण्यात आलेले एकूण ७१७ कोटी ३६ लाख रुपयांचे कर्ज, डिबेंचर स्वरूपातील १११ कोटी ३५ लाख रुपये आणि फुरसुंगी येथील जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील डीएसकेडीएल पब्लिक लिमिटेड कंपनीतील १८४ कोटी ४५ लाख रुपयांचा अपहार देखील उघडकीस आला आहे. तसेच धनंजय पाचपोरच्या बँक खात्यामार्फत २५ लाख रुपयांचा अपहार आणि इतर ९ कोटी १६ लाख रुपये असा मिळून २ हजार ९१  कोटी ११ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये आत्तापर्यंत पुरवणी आरोपपत्रासह तीन आरोपपत्र दाखल करण्यात आली आहेत.

मकरंद कुलकर्णी याला २००६ ते २००८ या कालावधीत दीपक कुलकर्णी, हेमंती कुलकर्णी व इतर सह आरोपीच्या मदतीने पैशाचा अपहार करण्याबाबत कट केला होता. यानुसार १८४ कोटी रुपयांचा जमीन गैरव्यवहाराच्या नावाखाली अपहार केल्याचेही निष्पन्न झाले आहे. या कटात मकरंद यांचा नेमका काय सहभाग होता याचा तपास सुरू आहे. तर त्याची बँक खाती आणि अपहाराच्या रकमेतून आरोपींनी कोणकोणत्या मालमत्ता खरेदी केल्या याचा तपास सुरू आहे. 

तसेच जमीन खरेदी -विक्री व्यवहारात महाराष्ट्र शासनाने १ मार्च २००३ मध्ये डीएसकेडीएल या कंपनीच्या सर्वे नंबरचा उल्लेख करून जमीन खरेदी करण्याची परवानगी दिले होती. त्यांनी अगोदर नातेवाइकांच्या नावाने जमिनी खरेदी केल्या. यानंतर एक ते दोन महिन्यांनी जमिनी डीएसकेडीएल या कंपनीला जास्त दराने विक्री केली. यादरम्यान जादाच्या मिळणाऱ्या रकमेवर मकरंद व इतर संशयित आरोपीनी अपहार केला असल्याचे अ‍ॅड. चव्हाण यांनी सांगितले आहे.  

मकरंदला बाहेरच्या देशात पळून जाताना मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. तसेच मकरंदला १० दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. चव्हाण यांनी केली.

मकरंद याने चौकशीस सहाय्य केले आहे. त्यांना हदयविकाराचा त्रास असल्याने आवश्यक औषधे मिळावी तसेच घरचे जेवण देण्यात यावे अशी मागणी कुलकर्णी यांचे वकील गौरव इनामदार यांनी केली आहे. पुढील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार करीत आहे.

यापुर्वी याप्रकरणात डीएसके ग्रुप कंपनीचे भागीदार संस्थाचे संचालक दीपक सखाराम कुलकर्णी, हेमंती दीपक कुलकर्णी, केदार प्रकाश वांजपे, सई केदार वांजपे, धनंजय पाचपोर, विनयकुमार बडगंडी, अनुराधा रामचंद्र पुरंदरे, नित्यानंद सदाशिव देशपांडे, सुनील मधुकर घाटपांडे, राजीव दुल्लभदास नेवासकर, शिरीष दीपक कुलकर्णी यांच्यावरही अटकेची कारवाई झाली होती. तर अश्विनी संजय देशपांडे, शिल्पा मकरंद कुलकर्णी, स्वरूपा मकरंद कुलकर्णी आणि तन्वी शिरीष कुलकर्णी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर महाराष्ट्र बँकेचे वरिष्ठ अधिकारी रवींद्र प्रभाकर मराठे, राजेंद्र वेदप्रकाश गुप्ता, सुशील उमरावसिंह मुहनोत यांना या गुन्ह्यातून न्यायालयाने वगळले आहे.