महसूल विभागाच्या कामकाजात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नागरिकांच्या अडचणी दूर करा – अपर मुख्य सचिव विकास खारगे – महासंवाद

    - Advertisement -

    ठाणे,दि.१८ : महसूल विभागाशी संबंधित शासकीय जमीन, शर्तभंग प्रकरणे, जमीन मोजणी, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा तसेच उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्यांची कामे अधिक गतिमान करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. नागरिकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करून महसूल विभागाच्या सेवांमध्ये पारदर्शकता, गती आणि कार्यक्षमता वाढवावी, असे निर्देश अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज कोकण भवन येथे दिले. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात कोकण विभागातील महसूल यंत्रणेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.

    या बैठकीला विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, अतिरिक्त विभागीय आयुक्त सिद्धाराम सालीमठ, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अपर आयुक्त वैशाली इंदानी उंटवाल आणि उपायुक्त रवींद्र पवार हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर मुंबई शहर, पालघर व रायगडचे जिल्हाधिकारी, ठाणे, सिंधुदुर्ग व रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी तसेच विभागातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले की, शासकीय जमिनीच्या शर्तभंगाच्या प्रकरणांमध्ये महसूल विभागाने नियमानुसार कठोर कारवाई करावी. शर्तभंग झालेल्या प्रकरणांमध्ये नियमानुसार जमीन शासन जमा करण्याची कार्यवाही करावी. यासाठी आवश्यक सूचना व परवानग्या वेळेत देऊन शासनाची जमीन सुरक्षित ठेवण्यास प्राधान्य द्यावे. शर्तभंग प्रकरणांमध्ये प्रभावी वसुली करून शासनाच्या मालमत्तेचे संरक्षण करावे, असेही निर्देश देण्यात आले.

    ते म्हणाले, महाखनिज प्रणालीचे काम महत्त्वाचे असून तिचा प्रभावी वापर करावा. प्रणालीमुळे खनिज क्षेत्रातील कामकाज अधिक पारदर्शक व सुलभ होण्यास मदत होणार आहे. राज्य शासनाच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या या उपक्रमाचा विस्तार करण्याबाबतही प्रयत्न करावेत. प्रणालीच्या माध्यमातून कामकाजातील अडचणी कमी करून सेवा अधिक वेगाने उपलब्ध करून द्याव्यात. महसूल विभागाने जमीनविषयक प्रकरणांमध्ये स्पष्टता आणि प्रभावी अंमलबजावणीच्या माध्यमातून आपली कार्यक्षमता अधोरेखित करावी. नागरिकांच्या तक्रारी व दावे-निवेदने प्राप्त झाल्यानंतर त्यावर नियमानुसार तातडीने निर्णय घेण्याची कार्यपद्धती विकसित करावी, असेही त्यांनी सांगितले.

    ‘सेवा संकल्प’ अभियान प्रभावीपणे राबवा
    ‘सेवा संकल्प’ अभियान प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देताना श्री.खारगे म्हणाले की,महसूल विभागाच्या कामकाजाचा नियमित आढावा घेण्यात यावा. प्रत्येक आठवड्याला महसूल विभागाशी संबंधित कामांचा आढावा घेऊन प्रलंबित प्रकरणांवर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ते म्हणाले, ‘महाराजस्व अभियान’ पुन्हा प्रभावीपणे सुरू करून विभागीय स्तरावर त्याची अंमलबजावणी करावी. नागरिकांना आवश्यक असलेली प्रमाणपत्रे व इतर महसूलविषयक सेवा उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणींचा स्थानिक पातळीवरच मार्ग काढावा. आवश्यकतेनुसार आधारकार्डसह इतर नागरिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय साधावा.
    अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा
    महसूल अधिकाऱ्यांनी नियमितपणे क्षेत्रभेटी द्याव्यात. आठवड्यातून दौरे करून प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घ्यावी असे सांगून श्री.खारगे यांनी सूचित केले की, नागरिकांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर प्रयत्न करावेत. केवळ कार्यालयीन पातळीवर कामकाज न करता प्रत्यक्ष क्षेत्रातील परिस्थिती समजून घेणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले.

    सुधारणांवर भर; ऑनलाइन सेवांना प्राधान्य
    अपर मुख्य सचिव श्री.खारगे यांनी महसूल विभागाच्या कामकाजात प्रशासकीय सुधारणांना विशेष प्राधान्य द्यावे. नागरिकांची कामे शक्य तितकी ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा. विभागाच्या कामकाजाचे निरीक्षण करण्यासाठी प्रभावी डॅशबोर्ड प्रणाली विकसित करावी. या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे, पूर्ण झालेली कामे आणि विविध सेवांची सद्यस्थिती यांचा नियमित आढावा घेता येईल, असे सांगून ‘Ease of Doing Business’ सोबतच ‘Ease of Performing’ या संकल्पनेवरही भर देऊन अधिकारी- कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी सुलभ आणि कार्यक्षम प्रणाली उपलब्ध करून द्यावी. शासनाच्या सेवा अधिक गतिमान करून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे हे महसूल विभागाचे उद्दिष्ट असावे, असेही सूचित केले.

    मोजणीची कामे १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश
    जमीन मोजणीच्या कामांचा नियमित आढावा घ्यावा. अर्ज प्राप्त झाल्यानंतर मोजणीचे काम शक्यतो १५ दिवसांच्या कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. प्रलंबित मोजणी प्रकरणांचा जिल्हानिहाय आढावा घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश देऊन श्री.खारगे यांनी मोजणीच्या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा आणि आधुनिक प्रणालीचा वापर वाढवावा. खासगी तज्ज्ञ/सर्वेक्षण यंत्रणांची आवश्यकता असल्यास नियमानुसार त्यांचा वापर करण्याबाबत कार्यवाही करावी, असे सांगितले.

    ‘सिस्टमने सर्व कामांची जबाबदारी घ्यावी’
    ते म्हणाले, महसूल विभागाच्या सेवा देताना नागरिकांना वारंवार कार्यालयात येण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी प्रणाली अधिक सक्षम करावी. अर्ज, तपासणी, मंजुरी, प्रमाणपत्र आणि संबंधित सेवांची माहिती डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा. “सिस्टमने सर्व कामांची जबाबदारी घ्यावी” या उद्देशाने तंत्रज्ञानाधारित प्रक्रिया विकसित कराव्यात.

    नवीन उद्योग-व्यवसाय सुरू करणाऱ्या नागरिकांना आणि उद्योजकांना आवश्यक परवानग्या व सेवांसाठी अनावश्यक अडथळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे वेळेत निराकरण करावे. शेवटी महसूल विभागातील सर्व सेवा अधिक पारदर्शक, गतिमान, नागरिकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधारित करून “कमी अडचणी – जलद सेवा – प्रभावी प्रशासन” या दिशेने काम करण्याच्या सूचनाही श्री.खारगे यांनी दिल्या.

    0000

    - Advertisement -