महाराजस्व अभियान व आरोग्य शिबिरातून गोंडपिपरीत ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ – महासंवाद

    - Advertisement -

    गोंडपिपरी, दि. १८ : नागरिकांना विविध शासकीय योजना आणि सेवा एकाच ठिकाणी सुलभ व जलदगतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गोंडपिपरी येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून ‘सेवा संकल्प अभियानाचा’ तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला.

    सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात महसूल, नगरपंचायत, पंचायत समिती, कृषी, आरोग्य आदी विविध विभागांनी सहभाग घेत नागरिकांना शासनाच्या विविध योजना व सेवांचा प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून दिला.

    शिबिरात महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तसेच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभांचे वितरण करण्यात आले. वर्ग-2 ते वर्ग-1 जमिनीबाबतचे आदेश लाभार्थ्यांना देण्यात आले. याशिवाय नवीन मतदार नोंदणीसह विविध महसूलविषयक सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

    नगरपंचायतीच्या माध्यमातून घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले. स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांना कचराकुंड्यांचेही वितरण करण्यात आले. पंचायत समिती, कृषी विभाग तसेच अन्य शासकीय विभागांच्या विविध योजनांतील लाभार्थ्यांनाही यावेळी लाभांचे वितरण करण्यात आले.

    आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सेवा संकल्प अभियानात आयोजित आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला. आरोग्य विभागाच्या पथकाने नागरिकांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.

    यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश वर्मा, तहसीलदार शुभम बाहकर, गोंडपिपरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, मुख्याधिकारी विवेक चौधरी, नगरसेवक राकेश पुन, गटविकास अधिकारी संजय नैताम, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    ००००००

    - Advertisement -