- आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधींसाठी तीन महत्त्वपूर्ण सामंजस्य करार
- सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ४,००० उमेदवारांच्या पूर्वकौशल्य ज्ञान प्रमाणीकरण व ३०० उमेदवारांच्या अल्पमुदतीच्या कौशल्य प्रशिक्षणाला चालना
मुंबई, दि. १५ : जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल, फोर्ट येथील सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राज्यातील कौशल्य विकासाला अधिक बळकटी देणाऱ्या विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.
वर्ल्ड बँकेच्या साहाय्याने, दक्ष प्रकल्पाअंतर्गत निदेशक प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी प्रशिक्षक प्रशिक्षण उपक्रमाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २४० प्रशिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यामध्ये अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल, सीएनसी मशीनिंग, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, प्लंबर, सर्व्हेअर, सीओपीए, वेल्डर, एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो या सारख्या उद्योगांनी सदर प्रशिक्षणाच्या सहकार्यासाठी पुढाकार घेतला आहे,
उद्योगाभिमुख कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी एसईईआयडी आणि 2 COMS Consulting Private Limited, Border Plus Technology Private Limited तसेच Quess International Services Private Limited यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. या करारांमुळे भाषा प्रशिक्षण, प्रस्थानपूर्व प्रशिक्षण, कागदपत्रांची पूर्तता, नियोक्त्यांशी समन्वय, डिजिटल ट्रॅकिंग तसेच प्लेसमेंटनंतरचे सहाय्य उपलब्ध होणार असून, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींसाठी आवश्यक सर्व मदत विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, नाशिक यांना ४,००० उमेदवारांच्या पूर्वकौशल्य ज्ञान प्रमाणीकरण तसेच ३०० उमेदवारांसाठी अल्पमुदतीचे कौशल्य प्रशिक्षण राबविण्यासाठी इरादा पत्र प्रदान करण्यात आले. हॉस्पिटॅलिटी, रिटेल, ऑटोमोबाईल, बांधकाम, आरोग्य सेवा आणि पर्यटन क्षेत्रांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यास या उपक्रमाची मदत होणार आहे.
यावेळी वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडल्या गेलेल्या महाराष्ट्रातील पाच राष्ट्रस्तरीय विजेत्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. तसेच वर्ल्डस्किल्स शांघाय 2026 स्पर्धेत या स्पर्धकांनी सुवर्ण पदक प्राप्त केल्यास ५ लाख रुपये रोख, रौप्य पदक मिळवणाऱ्या विजेत्यास ३ लाख रुपये आणि कांस्य पदक मिळवणाऱ्या स्पर्धकास २ लाख रुपये देण्याची घोषणा मंत्री लोढा यांनी केली.
तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई-१ येथील इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) अभ्यासक्रमातील प्रशिक्षणादरम्यानच रोजगारासाठी निवड झालेल्या ११ प्रशिक्षणार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. ग्रामीण व दुर्गम भागातील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र योजनेअंतर्गत दोन प्रशिक्षण संस्थांना इरादा पत्र प्रदान करण्यात आले. तसेच सीएसआर उपक्रमांतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना इनडोअर जिम, क्रीडा साहित्य आणि वॉटर कूलर्स उपलब्ध करून दिल्याबद्दल स्नेहधारा चॅरिटी कौन्सिलचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये शालेय स्तरापासून कौशल्य शिक्षणाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. भविष्यात कौशल्याचे महत्त्व अधिक वाढणार असून, राज्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक युवक-युवतीपर्यंत, विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील तरुणांपर्यंत आधुनिक कौशल्य प्रशिक्षण पोहोचविणे ही काळाची गरज आहे. भारतीय युवकांनी आपल्या गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या बळावर जगभरात विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे त्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींसाठी सक्षम बनविण्याच्या दिशेने शासन उद्योग, प्रशिक्षण संस्था आणि विविध भागीदारांच्या सहकार्याने सातत्याने कार्यरत आहे. महाराष्ट्राला अधिक कौशल्यसंपन्न राज्य बनविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे.”
कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता) मनीषा वर्मा, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त अमित सैनी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर स्किल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध उद्योग संस्थांचे प्रतिनिधी, प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षक, विद्यार्थी तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
संध्या गरवारे/विसंअ




















WhatsApp