नंदुरबार, दिनांक 07 मार्च 2024 (जिमाका वृत्त) : देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होत असलेला महासंस्कृती महोत्सव म्हणजे, महाराष्ट्रातील बहुपेडी कलांचा आरसा असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.
ते शहरातील यशवंत हायस्कूलच्या मैदानावर आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिश भामरे, नंदुरबारचे उपविभागीय अधिकारी विनायक महामुनी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व श्रोते या कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. अनेक कलाप्रकारांना आणि कलाकारांना महाराष्ट्राच्या या मातीने आणि रसिक प्रेक्षकांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. विविध कला आणि कलाकारांप्रती राज्याच्या शासनकर्त्यांचा दृष्टीकोन उदार, सकारात्मक आणि प्रोत्साहनाचा आहे. त्यामुळेच देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पाच दिवसीय ‘महासंसस्कृती’ महोत्सव प्रत्येक जिल्ह्यात भरवला जातो आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीच्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी रंगमंचीय कलांचा विकास करण्याची जबाबदारी शासनाची आहे, या गोष्टीस मान्यता दिली. सन 1960-70 या दशकातील पंचवार्षिक योजनांना मान्यता मिळताच सन 1970 साली मनोरंजन समितीचे सांस्कृतिक कार्य संचालनालयामध्ये रुपांतर करण्यात आले.
ते पुढे म्हणाले, सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शासकीय पातळीवरील सांस्कृतिक कार्यासंबंधीच्या योजना कार्यान्वित करण्यात येतात. या राज्यातील सांस्कृतिक अंगाची लोकांना माहिती व्हावी, एक प्रकारचे भावनात्मक ऐक्य निर्माण व्हावे, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने महोत्सव आयोजित करण्यात येतात. त्यात राज्य नाट्य महोत्सव, राज्य चित्रपट महोत्सव, तसेच संगीत, नृत्य, तमाशा, कीर्तन, भजन, लोककला, खडी गमंत, शाहिरी आणि दशावतार महोत्सव इत्यादी विविध कला महोत्सव आयोजित करण्यात येतात. याशिवाय या संचालनालयातर्फे नाट्यप्रशिक्षण शिबिरे, तमाशा प्रशिक्षण शिबिरे, बालनाट्य प्रशिक्षण शिबिरे, कीर्तन प्रशिक्षण शिबिरे व शाहिरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात. याशिवाय वयोवृद्ध, अपंग, आर्थिक स्थैर्य नसलेल्या कलाकारांना आर्थिक मदत प्रदान करणे, सांस्कृतिक कार्य क्षेत्रात कार्य करीत असलेल्या संस्थांना सहाय्यक अनुदान देणे इत्यादी कामे या संचालनालयाकडे आहेत. सन 1992-93 पासून कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल विविध बारा कला क्षेत्रात राज्य सांस्कृतिक पुरस्कार गौरविण्यात येते. सन 1991-92 पासून संगीत व गायन क्षेत्रातील प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्याबद्दल एका ज्येष्ठ कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 1993-94 पासून मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरीता ज्यांनी दिर्घकाळ आपले आयुष्य घालविले आहे तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा ज्येष्ठ कलाकारास चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने तसेच मराठी चित्रपट सृष्टीत विशेष योगदान देणाऱ्या एका कलाकारास चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने गौरविण्यात येते.
सन 1997-98 पासून हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरीता ज्यांनी दिर्घकाळ आपले आयुष्य घालविले आहे तसेच चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन इत्यादी अष्टपैलू गुणांनी त्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा ज्येष्ठ कलाकारास स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत विशेष योगदान देणाऱ्या एका कलाकारास स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2006-07 पासून मराठी रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ नाट्य कलाकारास नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. तसेच 2009-10 पासून मराठी संगीत रंगभूमीची प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ नाट्य कलाकारास संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2006-07 पासून तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ सेवा केलेल्या एका ज्येष्ठ कलाकारास तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2006-07 पासून संत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत असलेले मानवतावादी कार्य करणाऱ्या एका लेखकास / मान्यवरास ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने गौरविण्यात येते. सन 2011-12 पासून शास्त्रीय गायन व वादन या क्षेत्रात प्रदीर्घ काळ उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एका कलाकारास भारतरत्न पं. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. राज्याच्या वैभवशाली कलासंस्कृतीचे प्रदर्शन करणारा चित्ररथ दरवर्षी राजपथ, नवी दिल्ली येथे पाठविण्यात येतो.आजच्या महासंस्कृती महोत्सवात आपल्याला पाच दिवस वेगवेगळ्या माहाराष्ट्रातील लोककला व स्थानिक आदिवासी संस्कृतीतील डोंगऱ्या देव, होळी नृत्य, शिबली नृत्य यासह विविध स्थानिक परंपरांचा मिलाफ पहावयास मिळणार आहे. आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे मी आवाहन यानिमित्ताने मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी केले.
सर्वांनी कुटुंबासह महासंस्कृती महोत्सवाचा लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी मनीषा खत्री
दहा मार्चपर्यंत चालणाऱ्या या महासंस्कृती महोत्सवातून महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या कलांचा अविष्कार आपल्याला पहावयास मिळणार आहे. आपल्या नव्या पिढ्यांसाठी या कलांचे जतन करण्याची प्रेरणा मिळणार असल्याने जिल्ह्यातील सर्वांनी कुटुंबियांसाह या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी यावेळी केले आहे.
0000000000