महाराष्ट्रातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मालकी हक्काने घरे देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  – महासंवाद

    - Advertisement -

    • पंचशील नगर येथील इमारत प्री फॅब तंत्रज्ञानाने बनवलेली महापालिकेची पहिली इमारत

     मुंबई, दि. ६: आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारा स्वच्छता कर्मचारी हा खऱ्या अर्थाने उत्तम आरोग्य देणारा आहे. महाराष्ट्रातील सगळ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवानिवासस्थानासोबतच मालकी हक्काने घरे देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची सुरुवातही झाली आहे. त्यामुळे प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याला भविष्यात त्याच्या मालकी हक्काच्या घराची चिंता राहणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

    पंचशील नगर, कुलाबा येथे आश्रय योजना कक्ष, टप्पा-२ अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या कर्मचारी निवासस्थान चावी वितरण कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, महापौर रितु तावडे , उपमहापौर संजय घाडी, नगरसेवक मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होत्या.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आणि वाल्मिकी गृहनिर्माण या दोन योजना स्वच्छता कर्मचाऱ्यांकरिता सुरू केल्या आहेत. स्वच्छता  कर्मचाऱ्यांना देण्यात येत असलेले सेवा निवासस्थान संबंधित कर्मचाऱ्याचा मुलगा त्यांच्या जागी लागल्यानंतर हे निवासस्थान त्याला हस्तांतरित होते. स्वच्छता कर्मचाऱ्यांना २०२८ पर्यंत सेवा निवास स्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    प्री फॅब तंत्रज्ञानामध्ये आतापर्यंत केवळ मोठ्या खासगी इमारती तयार व्हायच्या. पहिल्यांदा महानगर पालिकेची इमारत या तंत्रज्ञानावर आधारित बनविण्यात आली आहे. या इमारत परिसरात सामूहिक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता मुंबईकरांच्या आरोग्य जपणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना चांगले प्रशस्त घर देण्याची जबाबदारी शासनाची आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

    मुंबई महानगरपालिका आशियातील तुलनेने एक संपन्न महानगरपालिका आहे. त्यांच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना प्रशस्त घर असायलाच पाहिजे, ही शासनाची भूमिका सातत्याने राहिली आहे. लाडपागे समिती १९७३ मध्ये तयार झाली आणि नंतर काही अडचणींमुळे या समितीचे कामकाज बंद झाले. ही समिती २०१५ मध्ये पुन्हा नव्याने शासन निर्णय काढत सुरू केली आणि वारस पद्धत लागू केली, असेही मुख्यमंत्र्यांनी प्रतिपादित केले.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या शिक्षण अहर्ता प्राप्त करणाऱ्या मुलांना वर्ग तीनमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने न्यायालयीन लढा जिंकत लाडपागे समितीच्या शिफारशी लागू केल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांसह कंत्राटी, रोजंदारी, ऐवजदार पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही किमान वेतन आणि त्यांच्या सोयी सुविधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

    स्वच्छता कर्मचारीच मुंबईचे खरे हिरो – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    मुंबई गाढ झोपेत असताना स्वच्छता कर्मचारी रस्त्यांची स्वच्छता करून मुंबईकरांचे आरोग्य जपतात. कोविड काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता त्यांनी सेवा बजावली. सखोल स्वच्छता अभियान तसेच पावसाळ्यात पाणी तुंबल्यानंतरही हे कर्मचारी रस्त्यावर उतरून काम करतात. त्यामुळे मुंबईचा खरा हिरो स्वच्छता कर्मचारी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे महत्व अधोरेखित केले.

    उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवा निवासस्थाने देण्याच्या उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. मुंबईतील १४६ कर्मचारी वसाहतींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास करून सर्व कर्मचाऱ्यांना दर्जेदार निवासस्थाने उपलब्ध करून देण्यात येतील. या प्रकल्पात १५० चौरस फुटांच्या घराऐवजी ३०० चौरस फुटांचे घर देण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने पूर्वनिर्मित अर्थात ‘प्री-फॅब्रिकेटेड’ तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर करून ही घरे जलदगतीने उभारली आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अशा प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

    अनेक स्वच्छता कर्मचारी मुंबईबाहेर राहतात. रेल्वेने दररोज करावा लागणारा प्रवास त्यांच्या आरोग्यावर आणि कामावर परिणाम करतो. त्यांना मुंबईत सेवा निवासस्थाने मिळाल्यास त्यांच्या आरोग्यासह कामाची कार्यक्षमता सुधारेल आणि मुंबई अधिक स्वच्छ व निरोगी होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

    स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊन डॉक्टर, अभियंता, वकील आणि वास्तुविशारद व्हावे तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या उच्च शिक्षणासाठी स्वतंत्र योजना तयार करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

    मुंबईतील २९ हजार सफाई कामगारांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीला सुरुवात – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

    मुंबईतील २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना घरे मिळवून देण्याच्या स्वप्नपूर्तीची सुरुवात पंचशील नगरातील १४० सदनिकांच्या चावीवाटपाने झाली आहे. मुंबई स्वच्छ आणि निरोगी ठेवणाऱ्या सफाई कामगारांना सन्मानपूर्वक निवास देण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल आहे, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

    पंचशील नगरातील दोन इमारतींमध्ये १४० सदनिका उभारण्यात आल्या असून, त्यामध्ये दहा लिफ्टसह आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्वच्छ परिसर, मुलांसाठी अभ्यासाच्या सुविधा आणि विविध उपक्रमांसाठी अनुकूल वातावरण यामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबांच्या उज्ज्वल भवितव्याला चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फीत कापून सदनिकांचे उद्घाटन करण्यात आले. तसेच त्यानंतर सदनिकांची पाहणी करण्यात आली.

    स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सदनिका योजनांचा दृष्टीक्षेप

    मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आश्रय योजना राबविण्यात येते या योजनेअंतर्गत ३० वसाहतीचा ३५ प्रकल्पांच्या माध्यमातून तीन टप्प्यांमधून पुनर्विकास करण्यात येत आहे. यामध्ये ३०० चौरस फूट क्षेत्रफळाची ११ हजार ३७१ आणि ६०० चौरस फुटाची ७७३ घरे अशी एकूण १२ हजार १४४ घरे देण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेच्या सर्व २९ हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवास्थान उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

    प्रतिनिधिक स्वरूपात चावी वितरण

    पंचशील नगर येथील १४० सदनिकांच्या चावी वितरण करण्यात आले. प्रतिनिधिक स्वरूपात पाच स्वच्छता कर्मचाऱ्यांना चावी देण्यात आली. यामध्ये भारती धोत्रे, सचिन सोलंकी, वंदना गोरेगावकर, श्यामसिंग वाल्मिकी, प्रशांत सावंत आणि सतीश मार्चंडे यांचा समावेश आहे.

    0000

    निलेश तायडे/विसंअ

     

     

    - Advertisement -