
मुंबई, दि. ५ : मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘आपलं मंत्रालय’ या गृहपत्रिकेचे प्रकाशन करण्यात येते. या गृहपत्रिकेच्या माध्यमातून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या साहित्यिक अभिव्यक्तीला वाव देण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.
दीपावलीनिमित्त ‘आपलं मंत्रालय’च्या वतीने मंत्रालयातील परिषद सभागृहात काव्यसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्रधान सचिव ब्रिजेश सिंह बोलत होते.
प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले, मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कवी आणि साहित्यप्रेमी आहेत. त्यांच्या साहित्यिक कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, तसेच त्यांना आपल्या कविता आणि साहित्य सादर करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यांना आपल्या कविता व साहित्य सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लेखनाचे आणि साहित्याचे मनापासून स्वागत आहे. आपलं मंत्रालय हे मासिक आपले आहे. ‘आपलं मंत्रालय’ हे केवळ एक मासिक नसून ते मंत्रालयातील प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे स्वतःचे व्यासपीठ आहे. त्यामुळे या मासिकाशी सर्वांनी आपलेपणाने जोडले जावे, त्यात सक्रिय सहभाग घ्यावा आणि आपल्या लेखनातून मासिक अधिक समृद्ध करावे, असे आवाहनही प्रधान सचिव सिंह यांनी यावेळी केले.
दीपावलीनिमित्त आयोजित ‘आपलं मंत्रालय’ काव्यसंध्येत सहभागी कवींच्या विविध विषयांवरील कवितांनी भावना, विचार आणि अनुभवांचे सुंदर विश्व उलगडले. शब्दांच्या या मैफलीतून कवितांचा आनंदोत्सव साजरा झाला आणि मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साहित्यिक कलागुणांना प्रोत्साहन मिळाले. यावेळी अपर मुख्य सचिव विकास खारगे, संचालक (माहिती) (प्रशासन) डॉ. किशोर गांगुर्डे, संचालक (माहिती) (वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे, मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी कीर्ती पांडे उपस्थित होते.
वाचनामुळे व्यक्ती प्रगल्भ होते – अपर मुख्य सचिव विकास खारगे
अपर मुख्य सचिव विकास खारगे म्हणाले, वाचनामुळे व्यक्ती प्रगल्भ होते, तिला विचार करण्याची नवी दृष्टी मिळते. सामान्य व्यक्तीला असामान्य बनविण्याची ताकद वाचनात आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचनाची आवड जोपासली पाहिजे. शासनाच्या वतीने साहित्य, कला आणि संगीत क्षेत्राच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमांचा लाभ घ्यावा. संबंधित विभागांच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन घेऊन आपल्या अंगभूत कलागुणांना अधिक विकसित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी सतीश मोघे, डॉ. नामदेव भोसले, मीनाक्षी पाटील, लीना संखे, अंजली ढमाळ, अजय भोसले, नामदेव कोळी, डॉ. जगदीश मोरे, शशी डंभारे, प्रवीण कुलकर्णी यांनी आपल्या कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, मानवी नातेसंबंध आणि जीवनातील विविध भावभावनांचे प्रतिबिंब सादर झालेल्या कवितांमधून उमटले.
प्रत्येक कवितेच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कविता, शब्द आणि भावनांच्या या सुरेख मैफलीने दीपावलीच्या आनंदोत्सवात साहित्यिक रंग भरले. नामदेव कोळी यांच्या ‘वाघूर’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
००००

WhatsApp