दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शासनाच्या सूचनांनुसार जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत कामांचे नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद

    - Advertisement -

    सांगली, दि. ५ : अल निनो व दुष्काळाच्या पार्श्वभूमिवर शासनाकडून वेळोवेळी निर्गमित सूचना लक्षात घेऊन महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद यंत्रणांनी चालू आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नियोजन करावे. तसेच, विहित मुदतीत 30 नोव्हेंबरच्या आत प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या.

    यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्रभारी सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) डॉ. पवन म्हेत्रे, सहायक आयुक्त समाजकल्याण बाळासाहेब कामत, पालकमंत्री महोदय यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी उदय पवार यांच्यासह जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागप्रमुख, जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदि उपस्थित होते.

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य द्यावे. चालू आर्थिक वर्षाचे नियोजन करताना दुष्काळाची दाहकता लक्षात घेऊन जलसंधारण कामांना, पशुधनास चारा आदि कामांना प्राधान्य द्यावे. सर्व कामांची तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही विहित कालमर्यादेत म्हणजेच 30 नोव्हेंबरच्या आत घ्यावी. प्राप्त निधी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद यंत्रणांनी विहित वेळेत खर्च करावा. मंजूर कामांचा दर्जा, गुणवत्ता उच्च प्रतीची असावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत मंजूर नियतव्यय, प्रत्यक्ष निधीची तरतूद, आतापर्यंत झालेला खर्च व कामांची सद्यस्थिती, गत आर्थिक वर्षातील प्रलंबित कामे, सद्य आर्थिक वर्षातील कामांची प्रशासकीय मान्यता, निविदा स्थिती, कार्यारंभ आदेश आदिंचा सविस्तर आढावा घेतला.

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रसुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान, नागरी दलितेतर वस्ती सुधार योजना, अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, आदर्श शाळांमध्ये विविध पायाभूत सुविधा, रस्ते, बंदिस्त गटारी, जलसंधारण आराखडा, पशुधनास चारा आदिंचा आढावा घेतला.

    00000

     

    - Advertisement -