जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसाठी मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण यशदामध्ये यशस्वीरित्या संपन्न – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ५ : जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणनेसंदर्भात चार दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे ५ नोव्हेंबर २०२६ रोजी झाला.

    महाराष्ट्र राज्यातील सहा महसूली विभागांमधून सहभागी झालेल्या एकूण १२० मास्टर ट्रेनर्ससह, जनगणना संचालनालय, महाराष्ट्र येथील २८ अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षणाचे दोन सत्रांमध्ये प्रत्येकी दोन बॅचेस अशा प्रकारे आयोजन करण्यात आले होते. पहिले सत्र (बॅच । व II) २८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत, तर दुसरे सत्र (बॅच III व IV) २ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले.

    महाराष्ट्र शासनाकडून नामनिर्देशित करण्यात आलेल्या मास्टर ट्रेनर्सची नियुक्ती राज्य जनगणना नोडल अधिकारी तथा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत करण्यात आली. यामध्ये महसूल प्रशासन, नगरपालिका, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक संस्थांमधील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या मास्टर ट्रेनर्सना जनगणना संचालनालय, महाराष्ट्र येथील नॅशनल ट्रेनर्स मार्फत प्रशिक्षण देण्यात आले.

    या प्रशिक्षणामध्ये सैद्धांतिक मार्गदर्शन, प्रात्यक्षिके आणि प्रत्यक्ष सराव यांचा समावेश होता. यामध्ये जनगणनेच्या संकल्पना, लोकसंख्या गणनेतील प्रश्नावली (प्रश्न क्र. १ ते ४०), लोकसंख्या गणनेसाठीचे मोबाईल अॅप, स्व-गणना आणि प्रगणक गटाचे मांडणी दर्शक नकाशे या विषयांचा समावेश होता. तसेच सूक्ष्म अध्यापन, PRAMAN कार्यपद्धतीवर आधारित जबाबदारी आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटीद्वारे माहिती संकलनाचा सराव अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देण्याच्या कौशल्यांचाही सराव करून घेण्यात आला.

    प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना, केंद्र शासनाचे सहसचिव तथा मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, महाराष्ट्र डॉ. निरुपमा जे. डांगे यांनी आगामी जनगणनेमध्ये मास्टर ट्रेनर्सची महत्वाची भूमिका अधोरेखित केली. तसेच क्षेत्रीय कामकाज पूर्ण होईपर्यंत प्रशासकीय व तांत्रिक सहाय्य सातत्याने उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्या म्हणाल्या, “जनगणनेचा पहिला टप्पा अर्थात ‘घरयादी व घरगणना’ राज्यात अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता जनगणनेचा दुसरा टप्पा म्हणजेच ‘लोकसंख्या गणना’ सुरू होणार असून, या टप्प्यामध्ये नागरिकांची प्रत्यक्ष माहिती संकलित करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत मास्टर ट्रेनर्सची जबाबदारी केवळ वर्गातील प्रशिक्षण देण्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांनी सातत्याने सहभागी राहून क्षेत्रीय कार्यासाठी आवश्यक ते सहकार्य व मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. तसेच, फेर तपासणी फेरीच्या अंतिम दिवसापर्यंत त्यांनी आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडणे आवश्यक आहे.” मास्टर ट्रेनर्सच्या जबाबदाऱ्यांविषयी अधिक माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले की, प्रशिक्षणाच्या पुढील टप्प्यात मास्टर ट्रेनर्स राज्यातील फील्ड ट्रेनर्सना मार्गदर्शन करतील. हे फील्ड ट्रेनर्स त्यानंतर घरोघरी भेट देऊन माहिती संकलनाचे काम करणाऱ्या सुमारे २.८२ लाख प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देतील आणि त्यांना आवश्यक ते सहकार्य करतील.

    यावेळी मुख्य प्रधान जनगणना अधिकारी, डॉ. डांगे यांनी असेही अधोरेखित केले की, मास्टर ट्रेनर्सची प्रमुख पर्यवेक्षकीय जबाबदारी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सहकार्य पुरविणे, मोबाइल अॅपचा वापर करताना उद्भवणाऱ्या अडचणर्णीचे निराकरण करणे, त्यांच्या शंकांचे व प्रश्नांचे निरसन करणे आणि PRAMAN या कार्यसंस्कृतीचे पालन करून प्रगणकांकडून अचूक व त्रुटीविरहित माहितीची नोंदणी सुनिश्चित करणे ही आहे.

    केंद्र शासनाच्या दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजीच्या अधिसूचना क्र. एस.ओ. 5913(ई) अन्वये, जनगणना २०२७ च्या दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणना महाराष्ट्र राज्यात २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्यानंतर १ ते ५ मार्च २०२७ या कालावधीत फेर तपासणी फेरी घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन गणना सुरु होण्यापूर्वी १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत स्व-गणना प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या जनगणनेसाठी संदर्भ १ मार्च २०२७ रोजीचे ००:०० वाजता निश्चित करण्यात आला आहे.

    0000

    - Advertisement -