
रायगड-अलिबाग दि.५ :- रायगड किल्ला व परिसर पर्यटन विकास आराखड्यांतर्गत किल्ला संवर्धन व विकासकामे नियोजनबद्ध आणि कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रायगड किल्ला व परिसर पर्यटन आराखडा प्राधिकरण समितीच्या ३१ व्या बैठकीत पालकमंत्री श्री.गोगावले बोलत होते.
यावेळी रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे, कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, श्री.देशमुख, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रविंद्र शेळके, कार्यकारी अभियंता, सा.बां.विभाग अलिबाग मोनिका धायतडक तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री.गोगावले यांनी बैठकीत रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या मंजूर कामांची सद्यस्थिती, सी-डॅक अंतर्गत कामे, एमआरएसएसीच्या पुढील टप्प्यातील कामे आणि स्वच्छतागृहांचे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे हस्तांतरण यांचा आढावा घेतला. प्रलंबित कामांबाबत संबंधित विभागांनी आवश्यक बाबींची पूर्तता करून पुढील कार्यवाही निश्चित करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
किल्ला परिसर प्लास्टिकमुक्त व कचरामुक्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविणे, कचरा संकलन व विल्हेवाटीची योग्य व्यवस्था करणे आणि पर्यटकांमध्ये जनजागृती वाढविण्याबाबत निर्देश देत होळीचा माळ छत्री येथील कामे, पाणीटंचाई व पूर्वनियोजित उपाययोजना, शिवसृष्टी प्रकल्पाची सद्यस्थिती तसेच साहित्य रोपवे व प्रवासी रोपवेच्या प्रस्तावांबाबतही पालकमंत्री श्री. गोगावले यांनी विस्तृत आढावा घेतला.
किल्ल्याच्या संवर्धन व विकासकामांशी संबंधित छायाचित्रे, नकाशे आणि तांत्रिक रेखाचित्रांचे शास्त्रोक्त जतन करण्यासाठी अभिलेख व दस्तऐवजीकरण कक्ष स्थापन करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
किल्ला संवर्धन व विकासकामाबाबत सर्व संबंधित विभागांनी कामांची प्रगती नियमितपणे तपासून समन्वयाने कार्यवाही करावी आणि प्रलंबित बाबींचा वेळेत निपटारा करावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
0000000

WhatsApp