दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि रोजगाराचे नियोजन करा – मंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    - Advertisement -

    मालेगाव, दि. ५ : संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांना व पशुधनाला पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्याचे सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पुढील दहा महिन्यांचे नियोजन करावे. तसेच जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.


    पोलीस परेड मैदान, एकात्मता चौक, मालेगाव येथे मालेगाव शहर व तालुक्यातील गावांसाठी आमदार स्थानिक विकास निधी, जिल्हा नियोजन व ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या एकूण १११ पाणी टँकरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे, उपविभागीय अधिकारी नितिन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे  गटविकास अधिकारी सुनिल धस यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

    मंत्री श्री. भुसे म्हणाले, मागील काळात मालेगाव तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीटंचाईच्या काळात टँकर उपलब्ध करून देण्यात आले होते. या टँकरचा गावातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासह लग्नसमारंभ, धार्मिक कार्यक्रम तसेच सुख-दुःखाच्या प्रसंगी मोठा उपयोग झाला आहे. काही ठिकाणी जुने टँकर वापराविना पडून असल्याचे त्यांची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांत टँकरची दुरुस्ती, आवश्यक भागांची बदलणी, सर्व्हिसिंग व रंगरंगोटी करण्यात आली. यासोबतच नवीन टँकर उपलब्ध करून आज १११ टँकरचे लोकार्पण करण्यात येत आहे. गावांनी या टँकरचा सार्वजनिक हितासाठी उपयोग करावा. ग्रामपंचायतींनी दरवर्षी आवश्यक देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी घ्यावी. टँकरच्या वापरासाठी नागरिकांवर अवाजवी शुल्क आकारू नये. या सुविधेचे जतन करून टँकरचे नुकसान होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.


    शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे वितरण सुरू

    दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने राज्यातील सुमारे दीड कोटी शेतकरी खातेदारांना पहिल्या टप्प्यात पाच हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून, या मदतीचे वितरण सुरू झाले आहे. मालेगाव तालुक्यातील सुमारे ७० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी केले. पीक नुकसानीच्या पंचनाम्यांनुसार पुढील टप्प्यात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात येणार असून, पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनाही नियमानुसार भरपाई मिळणार आहे. ई-पीक पाहणीची नोंद ऑनलाइन पद्धतीने होऊ न शकलेल्या शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शासन स्तरावर महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त बैठकीत याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार असून, कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता शासन घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

    पिण्याचे पाणी आणि पशुधनाला प्राधान्य

    दुष्काळी परिस्थितीत सर्वप्रथम नागरिकांना आणि पशुधनाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आगामी काळात तापमान व बाष्पीभवन वाढण्याची शक्यता लक्षात घेता ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन त्यानंतर उपलब्धतेनुसार शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन करावे. धरण व नदीवरील लाभधारक शेतकऱ्यांनी एकत्रित चर्चा करून उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय घ्यावा. आवश्यकतेनुसार दोन-तीन पाणी आवर्तनाऐवजी एकच आवर्तन उपलब्ध होऊ शकते, याची जाणीव ठेवावी, असेही मंत्री श्री.भुसे यांनी स्पष्ट केले.

    जलतारा प्रकल्पातून भूजल पातळी वाढविण्याचे आवाहन

    दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करत मालेगाव तालुक्यातही जलतारा प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी. या कामासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून दिले जाणार असून, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात अशा प्रकारचे जलसंधारणाचे खड्डे तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

    दुष्काळाला संधी मानून रोजगारनिर्मितीवर भर

    दुष्काळाच्या काळात नागरिकांच्या हाताला काम मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. १९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पाझर तलाव, रस्ते व अन्य जलसंधारणाची कामे झाली. त्याच धर्तीवर यंदाच्या दुष्काळी परिस्थितीकडे आव्हान म्हणून पाहून सकारात्मक नियोजन करावे. पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. गावांच्या भविष्यातील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आराखडे तयार करण्यात आले असून, ग्रामस्थांनीही त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे, पाणीटंचाईच्या काळात परस्पर सहकार्य करणे आणि जलसंधारणाच्या कामांत लोकसहभाग वाढविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.यावेळी मंत्री श्री भुसे यांनी वसुबारस निमित्ताने गोमातेचे पूजन करून उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

    0000

    - Advertisement -