मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एसटी महामंडळ आणि महामेट्रोमध्ये संयुक्त विकासासाठी सामंजस्य करार – महासंवाद

    - Advertisement -


    मुंबई, दि. ४ : पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आधुनिक स्वरूप देण्याच्या दृष्टीने शिवाजीनगर मध्यवर्ती बसस्थानकाचा अत्याधुनिक बस पोर्ट म्हणून विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) यांच्यात या जागेच्या संयुक्त विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत हा करार झाला.

    प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि एकात्मिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार

    या प्रकल्पामुळे पुणेकरांसह राज्याच्या विविध भागांतून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना आधुनिक, आरामदायी आणि एकात्मिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. शिवाजीनगर मेट्रो स्थानक, रेल्वे स्थानक आणि एसटी बसस्थानक यांची सांगड घालून प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे.

    शिवाजीनगर येथील एसटी महामंडळाच्या सुमारे १५ हजार ४०० चौरस मीटर जागेचा या प्रकल्पांतर्गत विकास करण्यात येणार आहे. यापैकी सुमारे ४ हजार ९०० चौरस मीटर जागेवर महामेट्रोने मेट्रो स्थानक उभारले असून, उर्वरित सुमारे १० हजार ५०० चौरस मीटर जागेवर अत्याधुनिक बस पोर्ट आणि व्यावसायिक सुविधांचा विकास प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी महामेट्रोची प्रकल्प अंमलबजावणी प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे.

    प्रस्तावित बस पोर्टमध्ये एसटी बस टर्मिनस, बस आगार, बस पार्किंग, व्यावसायिक व कार्यालयीन जागा तसेच प्रवाशांसाठी आवश्यक अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मेट्रो आणि रेल्वे स्थानकांशी थेट जोडणी असल्यामुळे हे केंद्र बहुविध सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्वाचे केंद्र ठरणार आहे. प्रकल्पाच्या बांधकामासाठी सध्याचे शिवाजीनगर एसटी बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात वाकडेवाडी येथील आरे डेअरीच्या जागेवर स्थलांतरित करण्यात आले आहे. या ठिकाणी प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा महामेट्रोच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर येथील नवीन बस टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यानंतर एसटी बसस्थानक पुन्हा मूळ जागेवर सुरू करण्यात येणार आहे.

    एसटी महामंडळाच्या आर्थिक हिताचे संरक्षण

    या संयुक्त विकास प्रकल्पात एसटी महामंडळाच्या जमिनीचे मूल्यांकन आणि प्रकल्पातील गुंतवणुकीचा वाटा विचारात घेऊन महसूल वाटप निश्चित केले जाणार आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या चार टक्के पर्यवेक्षण शुल्क महामेट्रोला मिळणार आहे. तसेच प्रकल्पासाठी ४९ अधिक ४९ वर्षांच्या भाडेपट्ट्याचा विचार करण्यात आला असून, यासाठी शासनाच्या लागू नियमांचे पालन केले जाणार आहे. एसटी महामंडळाच्या मालकीच्या जागेचा नियोजनबद्ध आणि अधिकाधिक प्रभावी वापर करून महामंडळाच्या उत्पन्नात वाढ करणे, प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समन्वय अधिक मजबूत करणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

    शिवाजीनगर बसस्थानकाचा हा महत्वाकांक्षी विकास प्रकल्प पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणातील महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. मेट्रो, रेल्वे आणि एसटी या तिन्ही वाहतूक सेवांची एकात्मिक जोडणी झाल्याने प्रवाशांना सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

    000

    संजय ओरके/विसंअ

    - Advertisement -