
- डॉक्टरांना सेवाभाव, संवाद आणि रुग्णांचा विश्वास जपण्याचे आवाहन
मुंबई, दि. ४ : डॉक्टर होणे ही पदवी असली, तरी डॉक्टर म्हणून समाजाचा विश्वास संपादन करणे ही खरी कमाई आहे. प्रत्येक रुग्ण वेदना आणि चिंता घेऊन रुग्णालयात येतो. उपचारानंतर तो समाधानाने घरी परतणे, हेच डॉक्टरांच्या सेवेचे यश आहे. त्यामुळे डॉक्टरांनी समर्पण, सेवाभाव,रुग्णसंवाद आणि संवेदनशीलतेने काम करावे असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत १४४० नवनियुक्त वैद्यकिय अधिकारी यांना नियुक्तीपत्रे वितरण समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी विधानपरिषद उपसभापती सचिन अहीर, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दिपक सावंत, खासदार संजय जाधव, खासदार धैर्यशील माने,आमदार मनीषा कायंदे, प्रधान सचिव डॉ. निपूण विनायक, आयुक्त डॉ. संजय काटकर, आयुक्त सुनील भोकरे , संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, संचालक डॉ. विजय कंदेवाड उपस्थित होते.
आरोग्य विभागासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने रुजू झालेल्या डॉक्टरांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, या डॉक्टरांमध्ये सुमारे ७०० महिला डॉक्टरांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे आणि गुणवत्तेच्या आधारे पूर्ण केली आहे. त्यामुळे डॉक्टरांची कमतरता असलेल्या भागांतील आरोग्य सेवा बळकट होण्यास मदत होईल.
राज्याच्या आरोग्य सेवेत एकाच वेळी १ हजार ४४० एमबीबीएस डॉक्टर दाखल झाल्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. आणखी ६२१ डॉक्टरांची भरती करण्यात येणार असून,गरजू रुग्णाला उपचार मिळाला पाहिजे यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टरांची पुरेशी उपलब्धता आवश्यक आहे. त्याचबरोबर डॉक्टरांना चांगले निवासस्थान, स्वच्छ व सुरक्षित परिसर, विरंगुळा आणि क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. डॉक्टरांवर रुग्णसेवेचा मोठा ताण असतो. त्यामुळे त्यांच्या कामासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
रुग्णालयांमध्ये उत्तम स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, पुरेसा औषधसाठा आणि सुसज्ज शस्त्रक्रियागृहे असली पाहिजेत. या सुविधांमुळे डॉक्टरांना अधिक परिणामकारकपणे काम करता येईल. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या वसतिगृहाचा तीन महिन्यांत कायापालट करण्यात आल्याचा दाखला देत राज्यातील डॉक्टरांच्या निवासव्यवस्थेतही आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याचबरोबर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी नियमित संवाद साधणेही तितकेच महत्वाचे आहे. डॉक्टरांनी आजार, उपचारपद्धती आणि रुग्णाची स्थिती याबाबत स्पष्टपणे माहिती दिल्यास गैरसमज टाळता येतात. डॉक्टरांनी दिलेला विश्वास आणि मानसिक आधार रुग्णाच्या उपचारांमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. डॉक्टरांच्या वागणुकीतून रुग्णाला आपुलकी आणि सुरक्षिततेची भावना मिळाली पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले.
कोविड काळात डॉक्टरांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेल्या सेवेचा उल्लेख करून त्यांनी वैद्यकीय क्षेत्राच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अनेक डॉक्टरांना संसर्ग झाला, काही डॉक्टरांनी प्राणही गमावले; मात्र कठीण परिस्थितीतही त्यांनी रुग्णालये सुरू ठेवून नागरिकांचे जीव वाचवले. डॉक्टरांची सेवा ही चोवीस तासांची जबाबदारी असून, शासन सेवेत दाखल झालेल्या डॉक्टरांनी आपल्या कामातून आरोग्य विभागाची आणि राज्य शासनाची प्रतिमा अधिक उंचावावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरोग्यविषयक निर्णय घेताना अनावश्यक प्रशासकीय विलंब टाळण्याची सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. उपचाराची गरज असलेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळाली पाहिजे असेही निर्देश दिले.
महाराष्ट्रातील आरोग्य विभागाला देशातील क्रमांक एकचा विभाग बनविण्याची जबाबदारी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची आहे. नव्याने दाखल झालेल्या डॉक्टरांनी सेवाभाव, तत्परता आणि उत्तम रुग्णसंवादाच्या माध्यमातून ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले.
प्रत्येक आरोग्य संस्थेत डॉक्टर उपलब्ध करण्याचा निर्धार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
राज्यातील एकही प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय डॉक्टरविना राहू नये, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने १ हजार ४०० डॉक्टरांची भरती केली आहे. नवनियुक्त डॉक्टरांनी पारदर्शकपणे काम करून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
सुमारे १० हजार उमेदवारांमधून या डॉक्टरांची निवड झाली आहे. पुढील टप्प्यात आणखी ६०० डॉक्टरांची भरती प्रक्रिया, १ हजार ९०० समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना राज्यातील उपकेंद्रांमध्ये नियुक्ती, तसेच ३५० नवीन ‘१०८’ रुग्णवाहिकांचे लोकार्पण लवकरच करण्यात येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५ हजार कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी १२ डॉक्टरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तिपत्रे देण्यात आली.
यावेळी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर,प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी मनोगत व्यक्त केले तर प्रस्तावना आयुक्त संजय काटकर यांनी केली.
0000
मनिषा सावळे/विसंअ

WhatsApp