महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन पूर्ववत सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. ४ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बंद करण्यात आलेले निवृत्तिवेतन पूर्ववत सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक असून, यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे, असे पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

    महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली एमएसआरडीसी कार्यालय, निर्मल भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अनिल धस, वित्त विभागाच्या उपसचिव मनीषा कामटे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन गुरव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीचे सरचिटणीस गजानन गटलेवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

    महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनासंदर्भात १६ मार्च २०१७ रोजी मंत्रिमंडळाने निर्णय घेतला होता. त्यानुसार २३ मार्च २०१७ रोजी शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने निवृत्तिवेतनाचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन स्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

    सध्या १७४ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तिवेतन प्रलंबित प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, मुख्यमंत्री कार्यालयाशी समन्वय साधून तसेच वित्त विभागाशी चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले.

    0000

    गजानन पाटील/विसंअ

    - Advertisement -