
मुंबई, दि. ४ : राज्यातील पर्यटन विकासाला कौशल्य विकास, ग्रामीण उद्योजकता आणि स्थानिक समुदायांच्या सहभागाची जोड मिळणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास, पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्मिती, कृषी पर्यटनाचा विस्तार आणि ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (सह्याद्री फार्म्स) आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) यांच्यासोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार नरिमन पॉईंट येथील पर्यटन संचालनालय येथे झाला.
या सामंजस्य करारावर पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे, सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद राजेभोसले आणि टाटा स्ट्राइव्हचे मुख्य परिचालन अधिकारी अमेय वंजारी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारांतर्गत पर्यटन व आदरातिथ्य क्षेत्रातील कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, कृषी पर्यटन व ग्रामीण पर्यटन स्थळांचा विकास करणे, पर्यटन आधारित उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि शेतकरी, युवक व महिलांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.
यावेळी पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये पर्यटन विकासासाठी नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि कृषी पर्यटनाची मोठी क्षमता आहे. या क्षमतेचा प्रभावी उपयोग करताना स्थानिक समुदायांना पर्यटन विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना आवश्यक कौशल्ये व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. सह्याद्री फार्म्स आणि टाटा स्ट्राइव्ह यांच्यासोबतचा हा सामंजस्य करार त्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे. या सहकार्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील युवक, महिला आणि शेतकऱ्यांना पर्यटन क्षेत्रातील नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाची आदर्श प्रारूपे विकसित करून त्यांचा राज्यभर विस्तार करण्यास मदत होईल. विशेषतः नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक मनुष्यबळाला पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.”
आदर्श कृषी पर्यटन व ग्रामीण पर्यटन क्लस्टर
या उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सह्याद्री मोहाडी क्लस्टर आणि पुणे जिल्ह्यातील पवना धरण परिसरात आदर्श कृषी पर्यटन व ग्रामीण पर्यटन क्लस्टर विकसित करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी, युवक, महिला आणि ग्रामीण समुदायांना पर्यटन क्षेत्राशी जोडून त्यांची क्षमता विकसित केली जाणार आहे. कृषी, अन्नप्रक्रिया आणि कृषी पर्यटनाशी संबंधित प्रत्यक्ष अनुभवाधारित उपक्रमांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींची प्राथमिक निवड, पात्रता तपासणी, समुपदेशन, स्थानिक संस्कृती आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्राच्या गरजांनुसार अभ्यासक्रम तयार करणे, प्रशिक्षित मार्गदर्शकांद्वारे प्रशिक्षण देणे तसेच यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करणे या बाबी राबविण्यात येणार आहेत. याशिवाय, पूर्वीच्या कौशल्यांची दखल घेऊन त्यांना औपचारिक मान्यता व प्रमाणपत्र देण्यासाठी ‘रिकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग’ (आरपीएल) प्रक्रियेलाही चालना दिली जाणार आहे.
विशेषतः नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर पर्यटन व हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ तयार करण्यावरही या सहकार्यांतर्गत भर दिला जाणार आहे. यामुळे कुंभमेळ्याच्या काळात भाविक व पर्यटकांना दर्जेदार पर्यटन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक मनुष्यबळाची क्षमता वाढविण्यास मदत होईल.
या उपक्रमासाठी पर्यटन संचालनालय धोरणात्मक मार्गदर्शन व संस्थात्मक सहकार्य करणार असून, संबंधित शासकीय विभाग, स्थानिक संस्था आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारकांमध्ये समन्वय साधणार आहे. सह्याद्री फार्म्सच्या माध्यमातून शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, युवक, महिला आणि ग्रामीण समुदायांना एकत्रित करून उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सहकार्य केले जाणार आहे. तर टाटा स्ट्राइव्ह आपल्या कौशल्य विकासातील अनुभव, प्रशिक्षण व्यवस्था आणि तंत्रज्ञानाधारित प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण व प्रमाणन प्रक्रियेला बळकटी देणार आहे.
महाराष्ट्रातील पर्यटन विकास केवळ पर्यटनस्थळांच्या पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न ठेवता स्थानिक समुदायांचा सहभाग, कौशल्य विकास, ग्रामीण उद्योजकता आणि शाश्वत रोजगारनिर्मिती यांच्याशी जोडण्याच्या दृष्टीने हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या त्रिपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून विकसित होणारी पर्यटन विकासाची प्रारूपे राज्यातील इतर भागांमध्येही विस्तारण्याची संधी निर्माण होणार आहे.
0000
संध्या गरवारे/विसंअ

WhatsApp