
मुंबई, दि.४ : शिक्षण, समता, सामाजिक न्याय आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार रुजवून महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाला दिशा देणारे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त त्यांच्या महान जीवनकार्याचा आणि परिवर्तनवादी विचारांचा जागर घडविणारी विशेष मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ आणि ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रसारित करण्यात येणार आहे. या विशेष मुलाखतीत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैचारिक योगदानाचा आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता उलगडला आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार, ६, शनिवार, ७, सोमवार, ९ आणि मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी दररोज सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. तसेच ‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे. या मुलाखतीचे निवेदन प्रणय चव्हाण यांनी केले आहे.
महासंचालनालयाची अधिकृत समाजमाध्यमे :
ट्विटर (X) : MahaDGIPR
फेसबुक : MahaDGIPR
यूट्यूब : MaharashtraDGIPR
महात्मा फुले यांनी शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जातिभेद, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमतेविरुद्ध संघर्ष करत त्यांनी समताधिष्ठित समाजनिर्मितीचा विचार मांडला. सत्यशोधक समाजाच्या स्थापनेतून त्यांनी सामाजिक सुधारणांच्या चळवळीला संघटित स्वरूप दिले. त्यांच्या कार्यामुळे वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना शिक्षण, स्वाभिमान आणि हक्कांसाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. त्यांच्या या क्रांतिकारी विचारांचा वारसा आजही सामाजिक परिवर्तनासाठी मार्गदर्शक ठरत आहे.
या मुलाखतीत महात्मा फुले यांचे जीवनकार्य, सत्यशोधक समाजाची स्थापना, सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेले कार्य, सामाजिक विषमतेविरुद्ध उभारलेला लढा, शेतकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत त्यांनी मांडलेले विचार अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच महात्मा फुले यांच्या विचारांचा महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय चळवळींवर झालेला प्रभाव, सामाजिक न्यायाची संकल्पना आणि समतामूलक समाजनिर्मितीसाठी आजच्या पिढीने त्यांच्या विचारांतून घ्यावयाची प्रेरणा याविषयी मंत्री छगन भुजबळ यांनी आपले विचार मांडले आहेत.
०००
जयश्री कोल्हे/विसंअ

WhatsApp