अतिवृष्टी व पूरबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्ह्याला ३१.५८ कोटींचा निधी मंजूर – महासंवाद

    - Advertisement -

    •  जिल्ह्यातील ४१ हजार बाधित शेतकऱ्यांना दिलासा

    यवतमाळ, दि. ४ : जिल्ह्यात जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ३१.५८ कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यापैकी शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ३०.०२ कोटी रुपये, तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी १.५६ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मदत व पुनर्वसन विभागाने २ नोव्हेंबर रोजी शासन निर्णय जारी करुन मंजुरी दिली आहे.

    या मंजूर निधीमुळे जिल्ह्यातील सुमारे ४१ हजार ६२० बाधित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बाधित शेतकऱ्यांना नुकसानाची मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मृद व जलसंधारण मंत्री ना. संजय राठोड यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता, त्याला यश आले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार पात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्यात येणार आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिक व शेतजमिनीच्या नुकसानीबाबत अमरावती विभागातील २ लाख १५ हजार ४९५ बाधित शेतकऱ्यांना  सुमारे २०१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश असून मदतीचा लाभ या जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना होणार आहे.

    शासन निर्णयानुसार, शेतीपिकांच्या नुकसानीची मदत थेट लाभ हस्तांतरण प्रणालीद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे. शेतजमीनीचे मालक असलेल्या फक्त अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना विहित दराने जास्तीत जास्त २ हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी. चालू हंगामामध्ये यापूर्वी शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी. कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना व्दिरुक्ती होणार नाही याची तहसिलदार यांनी व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.

    हा निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी.

    लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या आदेशाव्दारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाव्दारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत

    0000

    - Advertisement -