
- २०२६ ते २०३१ या कालावधीत लागू राहणार नवे निकष
मुंबई, दि ४ : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मच्छीमारांना आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत मदतीच्या निकषांमध्ये सुधारणा करण्यात आली असून, २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी हे सुधारित निकष लागू राहणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त मच्छीमार, लहान व सीमांत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मत्स्यव्यवसायासाठी सुधारित आर्थिक मदतीचे निकष
अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या दुरुस्तीसाठी प्रति बोट ८,००० रुपये, अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी प्रति जाळे ४,००० रुपये, पूर्णतः नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या पुनर्स्थापनेसाठी : प्रति बोट १९,००० रुपये, पूर्णतः नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांच्या पुनर्स्थापनेसाठी प्रति जाळे ५,१०० रुपये, मत्स्यबीज फार्मसाठी लहान व सीमांत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १३ शेतकऱ्यांना इनपुट सबसिडी देण्यात येणार आहे.
या मदतीसाठी पात्रता अटीही निश्चित करण्यात आल्या आहेत. संबंधित नुकसानीसाठी अन्य शासकीय योजनेंतर्गत मदत घेतलेली असल्यास त्याच नुकसानापोटी पुन्हा मदत मिळणार नाही. तसेच विमा संरक्षणातून मिळालेली रक्कम असल्यास ती आर्थिक मदतीत समायोजित केली जाणार आहे.
केंद्र सरकारच्या या सुधारित निकषांमुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात नुकसान सहन करणाऱ्या मच्छीमारांना बोटी व जाळ्यांच्या दुरुस्ती आणि पुनर्स्थापनेसाठी आर्थिक आधार मिळणार असून, मत्स्यव्यवसायाचे नुकसान भरून काढण्यास मदत होणार आहे.
0000
मनिषा सावळे/विसंअ

WhatsApp