
- आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांना १८ हजार ४० कोटींचा लाभ
मुंबई, दि. ४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, आज ४.८७ लाख शेतकऱ्यांना ४ हजार ७६४ कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला. आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या २०.७२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर १८ हजार ४० कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सह्याद्री अतिथिगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रकमेचे ऑनलाइन वितरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील तसेच मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली, तसेच ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे आणि पुनर्गठित अथवा फेरपुनर्गठित कर्जे या योजनेसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत.
योजनेची अंमलबजावणी ऑनलाइन संगणकीय प्रणालीद्वारे केली जात आहे. यासाठी राज्य शासनाने महाआयटीची नियुक्ती केली असून, बँकांकडून आतापर्यंत ३१.१७ लाख थकीत कर्जखात्यांची माहिती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे पात्र लाभार्थ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत १६ लाख ९६ हजार २०१, दुसऱ्या यादीत ४ लाख १९ हजार ७३७, तिसऱ्या यादीत ३ लाख ५१ हजार १९२, तर चौथ्या यादीत १ लाख १५ हजार ६९७ शेतकऱ्यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण २५ लाख ८२ हजार ८२७ पात्र शेतकऱ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आतापर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या १५.८५ लाख शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर यापूर्वी १३ हजार २७५ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. त्यात आजच्या ४.८७ लाख शेतकऱ्यांना वितरित केलेल्या लाभाची भर पडली आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या २०.७२ लाखांवर, तर वितरित कर्जमाफीची रक्कम १८ हजार ४० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
00000
काशिबाई थोरात/विसंअ

WhatsApp