नवी दिल्लीः दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. भाजपा, आप आणि काँग्रेसनं प्रचारात जोरदार आघाडी घेतलेली आहे. भाजपानंही सभा आणि रॅलींचा धडाका लावला आहे. महाराष्ट्रातील नेतेसुद्धा दिल्लीतील प्रचारात उतरले आहेत. महाराष्ट्रातल्या भाजपा सरकारमध्ये माजी शिक्षणमंत्री राहिलेल्या विनोद तावडेंसुद्धा भाजपाच्या प्रचारात दिसत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवालांनी विनोद तावडेंवर निशाणा साधला आहे. ज्यांनी महाराष्ट्रातल्या 1300 सरकारी शाळा बंद केलेल्या आहेत. ते आता दिल्लीत भाजपाचा प्रचार करत आहेत, असं म्हणत विनोद तावडेंवर टीका केली आहे. त्याउलट आम्ही भरपूर मेहनत करून सरकारी शाळा चांगल्या केल्या आहेत. त्यांना आपली शाळा दाखवणं, छोले भटुरे खाण्यास देणे आणि दिल्ली दर्शन करवलं पाहिजे, ते अतिथी आहेत, असंही केजरीवाल म्हणाले आहेत.
विनोद तावडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री होते. मात्र 2019मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं होतं. तेच आता दिल्लीत भाजपाचा प्रचार करत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने वेगवेगळ्या राज्यांतील प्रमुख नेत्यांना त्यांच्या राज्यातील रहिवासी राहत असलेल्या भागात सभा घेण्याची जवाबदारी दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी देवळी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अरविंद कुमार यांच्या समर्थनार्थ सभा घेतली. यावेळी त्यांनी शाहीन बाग आणि त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीवरून केजरीवाल सरकारवर टीका केली. तर केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना फडणवीस म्हणाले की, जर तुम्ही देशाबरोबर असाल तर तुम्ही देश तोडण्याची भाषा करणाऱ्या आरोपींच्या खटल्यांच्या फाईल का दाबून ठेवत आहात. देशाचे टुकडे करू असे म्हणणाऱ्या लोकांच्या विरोधातील फाईल गेल्या 8 महिन्यांपासून दाबून ठेवण्यात आल्या असून, अशा देशद्रोह्यांवर कारवाई केजरीवाल का होऊ देत नाही याचे उत्तर त्यांनी द्यावे, असेही फडणवीस म्हणाले.