- ‘नशामुक्त सांगली’ अभियानालाही प्रारंभ
सांगली, दि. 16 (जि. मा. का.) : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे अत्याधुनिक लाँड्री विभाग आणि मेल सर्जिकल सेमी आयसीयूचे लोकार्पण राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालय, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘नशामुक्त सांगली’ अभियानाचा शुभारंभही त्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रियांका राठी, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रूपेशकुमार शिंदे, महानगरपालिका गटनेते संदीप आवटी, नगरसेवक निरंजन आवटी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दीपक शिंदे-म्हैशाळकर यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधीतून मिरज शासकीय रुग्णालयात उभारण्यात आलेल्या या सुविधांमुळे शासकीय आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न आहे. मेल सर्जिकल सेमी आयसीयूमुळे गंभीर रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा, सुसज्ज बेड आणि आवश्यक वैद्यकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील. तसेच, लाँड्री विभागामुळे रुग्णालयातील कपडे धुण्याची आधुनिक व स्वच्छ व्यवस्था निर्माण झाली असून, स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, असे ते म्हणाले. अद्ययावत लाँड्री विभागांतर्गत कपडे शंभर टक्के ड्राय होऊन व इस्त्री करून मिळणार आहेत.

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘नशामुक्त सांगली’ अभियानांतर्गत पथनाट्य आणि विविध जनजागृती उपक्रमांच्या माध्यमातून युवकांसह नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत व्यापक प्रबोधन करण्यात येणार असून समाजात व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. नशामुक्त सांगली होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकार्पणानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अत्याधुनिक लाँड्री विभाग आणि मेल सर्जिकल सेमी आयसीयूची पाहणी करून तेथील उपलब्ध सुविधांची माहिती घेतली.
00000






















WhatsApp