मुंबई: मुंबईची गर्दी निर्दयी आणि जीवघेणी ठरू शकते याचा अनुभव सकाळच्या वेळी लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या अनेकांना येतो. पण प्रत्यक्ष डोळ्यादेखत या गर्दीने आज एकाचा जीव घेतला आणि दोन जण रुग्णालयात मृत्यूशी झुंजत आहेत. खचाखच भरलेल्या लोकलमधून ठाण्याजवळ तिघे जण पडले. त्यातल्या एकाचा मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये हे तिघे जण चढले होते. कल्याणहून गाडी भरून आली होती. मुंब्रा स्थानकात प्रचंड गर्दी उसळली आणि मुंगीलाही जागा उरणार नाही अशी अवस्था झाली. दाराजवळची गर्दी अजिबात हलायला जागा नव्हती. त्यामुळे पुढच्या कळवा स्थानकात उतरणाऱ्यांना दारापाशी यायला अवसरच नव्हता. या गर्दीचा रेटा दारात उभ्या असणाऱ्या प्रवाशांवर आला. दाराजवळ उभे असलेले तिघे जण या आतल्या गर्दीच्या रेट्याने खाली पडले. कळवा ते मुंब्रा स्थानकांदरम्यान रुळांवर पडल्याने त्यातल्या एकाचा मृत्यू झाला. जखमींवर कळव्याच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते दोघेही मृत्यूशी झुंज देत आहेत. सकाळी 10 नंतर खरं तर गर्दीचा ओघ कमी होतो. पण हा अपघात 10 नंतरच घडल्याचं समजतं.
लोकलबळींची संख्या धक्कादायक
मागच्या वर्षभरात 2700 जणांचा लोकलबळी गेला आहे. सर्व मार्गांवरच्या लोकल फेऱ्या वाढवल्यामुळे लोकलबळींची संख्या घटली असल्याचं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. 2019 चा हा 2700 मृत्यूंचा आकडा पाच वर्षांतला सर्वांत कमी आकडा आहे. यावरून लोकल अपघातांचं गांभी४य लक्षात येईल. एसी लोकल सुरू झाल्यानंतर लोकल बळींच्या आकड्यात आणखी घट होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.