
मुंबई, दि. ५ : नाट्यसंगीताच्या समृद्ध परंपरेचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘हे सुरांनो चंद्र व्हा – वारसा नाट्यसंगीताचा’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मराठी रंगभूमीला समृद्ध करणाऱ्या नाट्यसंगीताची परंपरा, त्यातील अजरामर रचना आणि भावसंगीताचा ठेवा रसिकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे. नाट्यसंगीताच्या सुवर्णकाळातील संगीताचा अनुभव रसिकांना या कार्यक्रमातून घेता येणार आहे. या कार्यक्रमात ओंकार प्रभुघाटे, केतकी चैतन्य आणि धनंजय म्हसकर हे गायक कलाकार नाट्यसंगीताच्या विविध रचना सादर करणार आहेत. अनघा मोडक निवेदिका म्हणून कार्यक्रमाची सूत्रे सांभाळणार आहेत.
वाद्यसाथीसाठी हर्षल काटदरे – ऑर्गन, प्रसाद पाध्ये – तबला, राजेंद्र भावे – व्हायोलिन, हनुमंत रावडे – पखवाज आणि अथर्व चांदोरकर – तालवाद्य यांची साथ लाभणार आहे. गायक आणि वादक कलाकारांच्या सुरेल सादरीकरणातून नाट्यसंगीताच्या वैभवशाली परंपरेचा अनुभव रसिकांना मिळणार आहे.
हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यसंगीत परंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, प्रवेशिका सोमवार, ५ ऑक्टोबर २०२६ पासून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘हे सुरांनो चंद्र व्हा – वारसा नाट्यसंगीताचा’ या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.
0000
संजय ओरके/विसंअ

WhatsApp