विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पावसात आज विक्रोळी येथील सूर्यानगर, भांडुपमधील मुन्शी महल परिसर व चेंबूरमधील भारतनगर येथील घटनास्थळी भेट देऊन मदत कार्याचा आढावा घेतला.तसेच त्या दुर्घटनाग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. विक्रोळी येथील दुर्घटनेत अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. काही कुटुंबातील मुले-मुली अनाथ झाले आहेत. अश्याच एका कुटुंबाचीही दरेकर यांनी भेट घेतली. या कुटुंबातील लहान भाऊ-बहिण अनाथ झाली आहेत. त्यांचे सात्वंन करताना दरेकर यांना गहिवरुन आले व ते शोकाकुल झाले. या पोरके झालेल्या या कुटुंबातील लहान भाऊ-बहिण यांच्या शिक्षणाची जबाबदारी भाजापातर्फे उचलण्यात येईल असे वचन त्यांनी त्या कुटुंबाला दिले व या कठिण परिस्थितीतही धीर देण्याचा प्रयत्न दरेकर यांनी केला. यावेळी भाजापाचे खासदार मनोज कोटक उपस्थित होते.
क्लिक करा आणि वाचा- मुंबईत पावसाचा हाहाकार Live: मुख्यमंत्र्यांनी बोलावली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
विक्रोळी,भांडुप,चेंबूर सारख्या दुर्घटना भविष्यात घटना घडू नयेत यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिका यासारख्या यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. निष्पाप मुंबईकरांचे बळी रोज जात आहेत. असा एकही पावसाळा नाही गेला ज्यामध्ये मुंबईकरांनी बळी पाहिले नाहीत. प्रशासन व महापालिका यांच्या बेजबाबदारपणाचे हे बळी असल्याचा आरोप करतानाच दरेकर म्हणाले की, मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर गेली वर्षोनुवर्षे पाणी तुंबण्याची ठिकाणे तीच तीच आहेत. तरीही पालिका हे थांबविण्यासाठी काहीही ठोस व कायमस्वरुपी यंत्रणा उभी करत नाही. विक्रोळीची भिंत जी पडली ती पूर्वीही पडली होती, ती पुन्हा बांधली. पण त्यावेळी निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाले. त्यामुळे रहिवाश्यांचा नाहक बळी गेला. जे बळी गेले त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आता तरी कडक उपाययोजना करा, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
क्लिक करा आणि वाचा- रेल्वे रुळ ओलांडताना वयोवृद्ध व्यक्ती ट्रेन खाली आली आणि…
मुंबईकरांचे आणखी बळी घेऊ नका. आता केवळ पालिकेने धोक्याची नोटीस बजावून त्यांची जबाबदारी सुटत नाही. त्या रहिवाश्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याची जबाबदारीही मुंबई महापालिकेची आहे. नोटीस लावून प्रश्न सुटतो का? त्यांना पर्यायी घरे कोण देणार असा सवाल करतानाच दरेकर म्हणाले की, माणूस आपला जीव गेला तरी चालेल पण आपले छोटे घर का सोडत नाही, कारण ते घर त्यांच्या मेहनतीने घेतलेले असते आणि दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे जीव मुठीत घेऊन त्याला राहावे लागते. जर आपण पालिका व प्रशासनाने त्यांची पर्यायी व्यवस्था केली तर लोक त्या ठिकाणी नाही मरणार. आता या प्रकरणाची चौकशी समिती लावली जाईल. आठ दिवसांनी सगळे शांत होईल. तथापि या दुर्घटनेची चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणीही दरेकर यांनी केली.
क्लिक करा आणि वाचा- मुंबई: चेंबूर परिसरात डोगरांवरील नागरिकांचे तातडीने स्थलांतर करणार; आदित्य ठाकरे