मुंबई शहर जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी नोंदणीची अंतिम मुदत १३ नोव्हेंबर – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २७ : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन, सुप्त कलागुणांना वाव देणे आणि राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मुंबई शहर जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवात मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अनिल घुगे, क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्याशी ९५९४३६९५६१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

    या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. समूह लोकनृत्य व समूह लोकगीत वगळता इतर स्पर्धांसाठी ‘नशामुक्त युवा, विकसित भारत’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या स्पर्धांमधून युवकांना आपली कला, सर्जनशीलता आणि सामाजिक विषयांवरील विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव अर्थात विकसित भारत युवा नेतृत्व संवाद १० ते १२ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

    १७ ऑगस्ट २०२६ रोजी वयाची १५ ते २९ वर्षे पूर्ण केलेले युवक-युवती या जिल्हास्तरीय महोत्सवात सहभागी होण्यास पात्र असतील. स्पर्धक हा मुंबई शहर जिल्ह्याचा रहिवासी असावा किंवा मुंबई शहर जिल्ह्यात शिक्षण घेत असावा. वयाच्या पुराव्यासाठी जन्मदाखला जोडणे आवश्यक आहे. एका स्पर्धकाला केवळ एका स्पर्धा प्रकारात सहभागी होता येईल. मागील वर्षीच्या राष्ट्रीय युवा स्पर्धेत सहभागी झालेल्या युवकांना चालू वर्षाच्या युवा महोत्सवात सहभागी होता येणार नाही.

    स्पर्धेतील सर्व सादरीकरणे मौलिक व स्वनिर्मित असावीत. सादरीकरण मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत करता येईल. प्रत्येक स्पर्धेचे सविस्तर नियम व अटी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून जाणून घ्याव्यात. स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

    0000

    श्रद्धा मेश्राम/विसंअ

    - Advertisement -