महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्यावतीने ‘उजेडाच्या वाटेवर’ छायाचित्र प्रदर्शन – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि.२८ : स्त्री म्हणजे केवळ घराचा आधार नव्हे, तर समाजाच्या जडणघडणीतील एक महत्वाची शक्ती. तिच्या कष्टांची, स्वप्नांची, संघर्षाची आणि कर्तृत्वाची ओळख करून देणारे मंत्रालय येथील त्रिमूर्ती प्रांगणात ‘उजेडाच्या वाटेवर’ हे छायाचित्र प्रदर्शन स्त्रीजीवनाचे अनेक अनोखे पैलू उलगडते. ‘उजेडाच्या वाटेवर’ ही संकल्पना मुळातच प्रकाश देणारी वाट दाखवणारी दिसून येते. कधी स्वतः प्रकाश होऊन, तर कधी पावलापुरत्या उजेडात वाट शोधत पुढे जाणाऱ्या स्त्रियांच्या जगण्याचे वास्तव या प्रदर्शनातून प्रभावीपणे समोर येते. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात राज्य महिला आयोगाने हे प्रदर्शन आयोजित केले होते.

    प्रदर्शनात जवळपास १५ छायाचित्रफलक मांडण्यात आले आहेत. प्रत्येक फलक एका महिलेचा संघर्षमय प्रवास उलगडत तिची जिद्द, कर्तृत्व आणि प्रगतीची वाट दर्शवतो.

    ‘अमोल’ या विषयातून घरकामात दिवसेंदिवस राबणाऱ्या स्त्रियांच्या श्रमांचे मोल अधोरेखित होते. घर सांभाळण्याचे काम अनेकदा गृहीत धरले जाते; मात्र या श्रमांमागे असलेली मेहनत, जबाबदारी आणि समर्पण अनमोल आहे. तर ‘चौकटीबाहेर’ या छायाचित्रविषयातून ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती, बांधकाम आणि लेथ मशीनसारख्या कामांत आत्मविश्वासाने वावरणाऱ्या महिलांचे चित्र दिसते. पुरुषांची मक्तेदारी मानल्या गेलेल्या क्षेत्रांतही स्त्रिया आपल्या कौशल्याने वेगळी ओळख निर्माण करत आहेत.

    ‘जिगरबाज’ आणि ‘स्वयंपूर्ण’ या छायाचित्रातून स्त्रीच्या धाडसाची, कौशल्याची आणि स्वावलंबनाची जाणीव होते. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत स्वतःच्या पायावर उभे राहण्याची तिची जिद्द या छायाचित्रांतून व्यक्त होते. ‘लगोरी’ आणि ‘तांबड्या माती’ या विषयांतून खेळणाऱ्या मुली आणि कुस्तीच्या आखाड्यात उतरलेल्या बालिकांचे चित्र पारंपरिक समजुतींना छेद देते. ताकद, चपळता आणि आत्मविश्वास यांना स्री-पुरुष चौकटीत बांधता येत नाही, हा संदेश त्यातून मिळतो.

    डोंबाऱ्याच्या खेळात कसरत करणाऱ्या चिमुरडीचे छायाचित्र मात्र मनाला अस्वस्थ करते. ज्या वयात तिच्या हातात पुस्तक असावे, त्या वयात ती जगण्यासाठी दोरीवर तोल सांभाळत आहे. तिच्या कौशल्याचे कौतुक करतानाच तिच्या बालपणाचा, शिक्षणाचा आणि सुरक्षिततेचा विचार करायला हे छायाचित्र भाग पाडते. तिची जिद्द प्रेरणादायी असली, तरी प्रत्येक मुलीला धोक्याच्या दोरीवर नव्हे, तर सुरक्षित जमिनीवर उभे राहून स्वप्ने पाहता आली पाहिजेत.

    ‘अबला की सबला’ या विषयातून स्त्रीचे स्वातंत्र्य, जोडीदार निवडीचा अधिकार आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तिची क्षमता दिसते. ‘सहजीवन’ या छायाचित्रांतून वयाच्या पलीकडे टिकून राहणारे प्रेम, आपुलकी आणि नात्यांमधील गोडवा अनुभवायला मिळतो. तर ‘जगण्यासाठी गुंफण’ या छायाचित्रातून ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या सामूहिक सहभागाचे, परस्परविश्वासाचे आणि एकजुटीचे दर्शन घडते.

    ‘महिलांची सुरक्षितता’ आणि ‘ ‘सन्मान’ हाही या प्रदर्शनाचा महत्वाचा भाग आहे. ‘शी बॉक्स’ या विषयातून कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाविरुद्ध तक्रार करण्याच्या व्यवस्थेचे महत्व ठळकपणे दिसते. ‘आता रडायचे नाही, आता थांबायचे नाही’ हा संदेश महिलांना अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याची प्रेरणा देतो. महिलांच्या तक्रारींची दखल घेणे, समुपदेशन आणि संबंधित यंत्रणांशी समन्वय साधणे यांद्वारे महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांना न्याय मिळविण्यासाठी सहाय्य करतो.

    आयोगाच्या अधिकारांविषयी आणि कायदेशीर तरतुदींविषयी जनजागृती करण्याचे महत्वही यातून स्पष्ट होते. ‘पंढरीच्या वाटेवर’ या छायाचित्रातून महिला वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवासासाठी आवश्यक सुविधांची जाणीव होते. स्वच्छतागृहे, न्हाणीघरे आणि दामिनी पथकाची मदत यासारख्या उपाययोजना स्त्रियांच्या प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेशी निगडित आहेत. श्रद्धेच्या प्रवासातही महिलांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होता कामा नये, हा या विषयाचा महत्वपूर्ण संदेश आहे.

    ‘उजेडाच्या वाटेवर’ हे प्रदर्शन केवळ स्त्रियांच्या संघर्षाची कहाणी सांगत नाही, तर समाजाला स्वतःच्या दृष्टिकोनाचे परीक्षण करण्याची संधी देते. स्त्रीच्या श्रमांना मान्यता, तिच्या क्षमतेवर विश्वास, तिच्या निर्णयांचा आदर आणि तिच्या हक्कांची जपणूक या गोष्टी समानतेच्या समाजासाठी आवश्यक आहेत.

    स्त्रीच्या वाटेतील अडथळे दूर करणे महत्वाचे आहे. तिच्या कर्तृत्वाला मान्यता देणारे आणि तिच्या स्वप्नांना समान संधी देणारे वातावरण निर्माण झाले, तर तिचा प्रवास अधिक सक्षम होईल. स्त्रीच्या आयुष्याचे अनेक पदर संवेदनशीलतेने उलगडणारे हे प्रदर्शन म्हणूनच केवळ पाहण्याचा अनुभव नसून, विचार करण्याची आणि समाजातील बदलाची सुरुवात करण्याची प्रेरणा आहे.

    या छायाचित्र प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक छायाचित्रासोबत गुंफलेल्या कवी आणि कवयित्रींच्या कविता. छायाचित्रे आणि कवितांचा हा सुंदर संगम प्रदर्शनाला अधिक जिवंत, संवेदनशील आणि आशयपूर्ण बनवतो. या प्रदर्शनात प्रज्ञा दया पवार, सुमती लांडे, कल्पना दुधाळ, संजीवनी बोकील, अजय कांडर आणि प्रकाश होळकर यांच्यासह संत जनाबाई, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, नारायण सुर्वे आणि अरुण काळे यांच्या कवितांचा समावेश आहे.

    प्रदर्शनाच्या निर्मितीत संकल्पना व छायाचित्रे- संदेश भंडारे, शब्दांकन वर्षा कुलकर्णी, इंग्रजी अनुवाद  उदय ओक, कविता निवड अजय कांडर, प्रदर्शन रचना ,सिद्धार्थ सहाय्य , जितेंद्र कळसकर सुंदरलेखन : प्रभाकर भोसले आणि किशोरी गद्रे यांनी केले आहे. हे प्रदर्शन ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत त्रिमूर्ती प्रांगणात आहे.

    या प्रदर्शनाचे वेगळेपण म्हणजे हे पारंपरिक प्रदर्शन नसून ‘वॉक-इन’ स्वरूपाचे प्रदर्शन आहे. सर्वसाधारणपणे प्रदर्शन म्हटले की भिंतींवर लावलेली चित्रे किंवा छायाचित्रे पाहणे, अशी संकल्पना आपल्या डोळ्यांसमोर येते. मात्र, या प्रदर्शनात प्रेक्षकांना प्रत्यक्ष प्रवेश करून प्रदर्शनाचा अनुभव घेता येतो. त्यामध्ये प्रेक्षकांनी अनुभव घेणे हे उद्दिष्ट असते ते येथे साध्य झाले असल्याचे दिसत आहे असे राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे यांनी सांगितले.

    0000

    मोहिनी राणे/स.सं

    - Advertisement -