
देशाचे भविष्य घडविण्यात तरुण पिढीची भूमिका महत्वाची असते. मात्र, हे भविष्य घडविणाऱ्या तरुणांचे आरोग्य किती चांगले आहे, याचाही विचार होणे गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात बदललेल्या आहाराच्या सवयी, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, मानसिक ताण आणि मोबाइलचा वाढता वापर या सर्वाचा तरुणांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकदा आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतरच आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले जाते. प्रत्यक्षात आजार होण्याची वाट पाहण्यापेक्षा निरोगी जीवनशैलीची जाणीव तरुण वयातच निर्माण होणे अधिक महत्वाचे आहे. यासाठी शिक्षणसंस्था आणि वैद्यकीय क्षेत्राने एकत्र येणे, ही काळाची गरज आहे. याच विचारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद – जागर आरोग्याचा’ हा उपक्रम महत्वाचा ठरतो.
आजच्या तरुणाईचे जग वेगाने बदलत आहे. अभ्यास, मनोरंजन आणि मित्र-मैत्रिणींशी संवाद यासाठी मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी शारीरिक हालचाली कमी होणे, खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे आणि झोपेच्या वेळा अनियमित होणे अशा समस्या दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेनेही नियमित शारीरिक हालचाल आणि पुरेशी झोप यांचे महत्व अधोरेखित केले आहे. मात्र, दैनंदिन जीवनातील धावपळीत या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होते.
मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या असंसर्गजन्य आजारांचे आव्हान दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचबरोबर अभ्यासाचा ताण, स्पर्धा, भविष्याची चिंता आणि एकटेपणा यांचाही मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. या समस्यांकडे केवळ वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने पाहून चालणार नाही. योग्य माहिती, वेळेवर मार्गदर्शन आणि आरोग्यदायी सवयी यातून अनेक धोके कमी करता येतात. त्यासाठी विद्यार्थिदशेतच आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे.
शास्त्रोक्त माहिती, मोकळा संवाद
आज समाजमाध्यमांवर आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध होते. मात्र, प्रत्येक माहिती शास्त्रीय आणि विश्वासार्ह असेलच असे नाही. चुकीच्या समजुतींमुळे अनेकदा आरोग्यविषयक निर्णयही चुकीचे घेतले जातात. अशा वेळी आरोग्यविषयक तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची ठरते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नवरात्रीत सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद जागर आरोग्याचा’ या उपक्रमामागता हा विचार खरोखर स्तुत्य आहे. डॉक्टरांनी रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची वाट पाहण्याऐवजी महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, हा त्यातील महत्वाचा दृष्टिकोन आहे. वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, विभागप्रमुख आणि वरिष्ठ तज्ज्ञांनी वैद्यकीय तसेच कृषी, अभियांत्रिकी, विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांतील विद्यार्थ्यांचा या आरोग्यविषयक कार्यक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे.
राज्यातील सात विभागांत ९९८ सत्रांच्या माध्यमातून १ लाख ३ हजार १३३ विद्यार्थ्यांपर्यंत हा संवाद पोहोचला. या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची, शंका मांडण्याची आणि तज्ज्ञांकडून उत्तरे मिळविण्याची संधी मिळाली. भाषणांपेक्षा प्रश्नोत्तरे, दैनंदिन जीवनातील उदाहरणे आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत केलेले मार्गदर्शन यांमुळे आरोग्यविषयक विषय अधिक सहजपणे समजण्यास मदत झाली. तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांमधील अंतर कमी होणे, हे या उपक्रमाचे महत्वाचे यश आहे.
मानसिक आरोग्य ‘टेलि-मानस’ सज्ज
शारीरिक आरोग्याइतकेच मानसिक आरोग्यही महत्वाचे आहे. मात्र, मानसिक ताण, नैराश्य किंवा भावनिक अडचणी यांविषयी बोलताना अनेक विद्यार्थी संकोच करतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांना सुरक्षित आणि विश्वासाचे वातावरण मिळणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांना ताण जाणवणे, भविष्याविषयी चिंता वाटणे किंवा एखाद्या अडचणीच्या काळात मदतीची गरज भासणे स्वाभाविक आहे. अशा वेळी योग्य व्यक्तीशी बोलणे आणि गरजेनुसार तज्ज्ञांची मदत घेणे महत्वाचे आहे. मदत मागणे हा कमकुवतपणा नसून स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याचा भाग आहे, ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हायला हवी. केंद्र शासनाची ‘टेलि-मानस’ ही १४४१६ क्रमांकावरील दूरध्वनी सेवा मानसिक आरोग्यविषयक मदतीसाठी उपलब्ध आहे. अशा सुविधांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणेही तितकेच गरजेचे आहे.
विद्यार्थी बनतील आरोग्यदूत
आरोग्यविषयक माहिती केवळ ऐकण्यापुरती मर्यादित राहू नये, तर तिचा दैनंदिन जीवनात उपयोग व्हावा, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. तरुणांना आपल्या वयोगटातील मित्रमैत्रिणींचे म्हणणे अधिक सहजपणे समजते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः आरोग्यदूताची भूमिका बजावणे महत्वाचे ठरते.
सत्रांमधून मिळालेली माहिती विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबीयांना सांगू शकतात. संतुलित आहार, मीठ आणि साखरेचे मर्यादित सेवन, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि वेळेवर आरोग्य तपासणी यांचे महत्त्व ते आपल्या घरातही पटवून देऊ शकतात. अशा प्रकारे एका विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेला संदेश संपूर्ण कुटुंबापर्यंत जाऊ शकतो. आरोग्यविषयक माहिती समजून घेणे आणि ती इतरांपर्यंत जबाबदारीने पोहोचविणे, या दोन्ही गोष्टी आरोग्यसाक्षर समाजासाठी आवश्यक आहेत.
प्रतिबंध हाच खरा उपचार
‘उपचारापेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ’ हे तत्व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आजार उद्भवल्यानंतर उपचार करण्याबरोबरच आजार होण्याची शक्यता कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महाविद्यालयीन वय हे आयुष्यभर उपयोगी पडणाऱ्या सवयी विकसित करण्याचे महत्त्वाचे टप्पे आहे. या काळात योग्य आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची सवय लागल्यास तिचे फायदे पुढील आयुष्यातही मिळतात. त्यामुळे आरोग्यविषयक मार्गदर्शन हे एखाद्या कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले पाहिजे.
संवादातून कृतीकडे
या उपक्रमाचे सातत्य टिकविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात आरोग्य मंडळ स्थापन करणे, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करणे आणि गरजूंना समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून देणे यांसारखे प्रयत्न करता येतील. महाविद्यालयांमधील उपाहारगृहांत आरोग्यदायी पदार्थांना प्राधान्य, खेळाच्या सुविधांचा वापर आणि तंबाखूमुक्त परिसर यांनाही महत्व द्यायला हवे.
ग्रामीण, आदिवासी आणि शहरी भागांतील विद्यार्थ्यांच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे त्यांच्यापर्यंत त्यांच्या गरजांनुसार आणि समजेल अशा भाषेत माहिती पोहोचविणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात आणि आरोग्यविषयक सवयींमध्ये काय बदल झाला, याचा आढावा घेतल्यास पुढील नियोजन अधिक परिणामकारक करता येईल.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची भूमिका केवळ डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य व्यावसायिक घडविण्यापुरती मर्यादित नाही. समाजाला आरोग्यसाक्षर बनविणे हीदेखील आमची सामाजिक जबाबदारी आहे. या उपक्रमात राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांतील तज्ज्ञांनी उत्साहाने सहभाग घेतला. महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दिलेले सहकार्यही महत्वाचे ठरले. या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो.
निरोगी तरुणाई, सक्षम महाराष्ट्र
‘आरोग्यं परमं भाग्यं, स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्’ या सुभाषितातून आरोग्याचे महत्व अधोरेखित होते. भारतीय वैद्यकीय परंपरेतही शरीरासोबत मनाच्या स्वास्थ्याला महत्व दिले आहे. आधुनिक आरोग्यविचारदेखील शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याकडे एकत्रितपणे पाहण्यावर भर देतो. निरोगी असणे म्हणजे केवळ आजार नसणे नव्हे, तर सक्षम आणि आनंदी जीवन जगता येणे होय.
‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद जागर आरोग्याचा’ या उपक्रमातून एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत आरोग्याचा संदेश पोहोचला आहे. आता या संदेशाचे रूपांतर कृतीत होणे महत्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने एखादी चांगली सवय अंगीकारली आणि ती आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचविली, तरी त्याचा व्यापक परिणाम साधता येईल.
विद्यार्थ्यांचा सहभाग, पालक आणि शिक्षकांचे मार्गदर्शन, शासनाचे पाठबळ आणि वैद्यकीय क्षेत्राचे सहकार्य यांच्या एकत्रित प्रयत्नांतून आरोग्यसाक्षर पिढी घडविता येईल. आजच्या तरुणाईला आरोग्याबाबत सजग करणे म्हणजे उद्याच्या महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत करणे होय. या जाणिवेतूनच ‘आरोग्यसंपन्न तरुणाई, सक्षम महाराष्ट्र’ हे ध्येय साकार करण्यासाठी आपण सर्वांनी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे.
-डॉ. व्यंकट गिते, कुलगुरू
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,
नाशिक
0000

WhatsApp