मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’च्या ट्रेलरचा शुभारंभ – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. २९ :  ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ या चित्रपटाच्या ट्रेलरचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे करण्यात आला. यावेळी खासदार ॲड. उज्ज्वल निकम, अभिनेते राजकुमार राव, मॅडडॉक फिल्म्सचे निर्माते-दिग्दर्शक, तसेच पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी आणि शहीद पोलिसांचे कुटुंबीय उपस्थित होते.

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, २६/११च्या घटनेनंतर दहशतवादाविरोधात न्यायालयात अनेक वर्षे जी लढाई लढली गेली, ती या चित्रपटाच्या माध्यमातून जनतेसमोर येणार आहे. हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही तर हा एक संदेश देणारा चित्रपट आहे. आपल्या पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने अत्यंत विचारपूर्वक संपूर्ण जगाला हे दाखवून दिले की, भारत हे असे राष्ट्र आहे जिथे कायद्याच्या माध्यमातून न्याय दिला जातो. विशेषतः उज्ज्वल निकम यांच्यामुळे शहिदांना न्याय मिळाला.

    २६/११ च्या रात्री शौर्याने लढलेल्या आणि दहशतवाद्यांना काबूत आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आपल्या वीरांचा आज आपण सन्मान केला आहे. या सर्व खऱ्या नायकांसाठी अंतिम न्याय म्हणजे जगाने या घटनेमागील दहशतवादी कारवायांची वस्तुस्थिती जाणून घेणे महत्वाचे होते. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

    मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चित्रपटासाठी संपूर्ण टीमला  शुभेच्छा दिल्या.

    कार्यक्रमाच्या सुरवातीला २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. शहीदांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यात आली. २६/११च्या हल्ल्याच्या वेळी मुंबईच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत शौर्याने दहशतवाद्यांचा मुकाबला करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

    ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ हा चित्रपट ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासासह २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित न्यायालयीन लढाईवर आधारित आहे. चित्रपटात राजकुमार राव यांनी ॲड. उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

    ००००

    योगेश मोरे/उपसंपादक

     

     

     

    - Advertisement -