हायलाइट्स:
- अभिनव कोहलीने पुन्हा श्वेता तिवारीवर केली टीका
- अभिनव म्हणतो, माझ्या मुलाला एकट्याला ठेवून परदेशात मजा करते आहे श्वेता
- महिलांना न्याय देताना पुरुषांवर अन्याय करू नका, अभिनव कोहलीची विनंती
अभिनव कोहली आणि श्वेता तिवारी यांच्यात त्यांचा मुलगा रेयांशच्या ताब्यावरून वाद सुरू आहेत. हा वाद आता मुंबई हायकोर्टात गेला आहे. दरम्यान त्या पूर्वी या दोघांनी एकमेकांवर सोशल मीडियावरून आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे सगळ्यांना त्यांच्यातील वाद पराकोटीला पोहोचल्याचे समजले. श्वेताने अभिनववर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. मात्र अभिनवने श्वेताने केलेले सर्व आरोप फेटाळून लावत उलट तिच आपल्याला मारहाण करायची असे सांगितले आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या फादर्स डे निमित्ताने अभिनवने पुन्हा एकदा त्यांच्या मुलाला रेयांशला भेटण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला भेटता आले नाही. अखेर त्याने आपली व्यथा सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून मांडली आहे.
काय म्हणाला अभिनव
अभिनवने आपली व्यथा सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून मांडली आहे. या व्हिडीओमध्ये अभिनव म्हणतो, ‘ फादर्स डे असल्यामुळे मी रेयांशला भेटायला गेलो होतो. परंतु आमची भेट झाली नाही. गेल्यावर्षी देखील मी त्याला भेटू शकलेलो नव्हतो. त्याला भेटण्याचे खूप प्रयत्न केले परंतु त्यात मी अपयशी ठरलो. ही लढाई मी हरलो आहे. आता काही दिवसांनी श्वेता परत येईल. माझ्या मुलाला एकट्याला दीड महिना ठेवून ती दक्षिण आफ्रिकेला निघून गेली. तिथे तिची मौजमजा सुरू आहे. परंतु इथे आई-वडिल असूनही माझा मुलगा दीड महिना एकटा आहे. मी त्याला हरएकप्रकारे भेटण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी ठरलेत.’
अभिनव पुढे म्हणाला की, ‘माझ्यासारखे खूप पुरुष आहे, ते अनेक लढाया हरले आहेत… मी देखील हरलो आहे. परंतु प्रत्येक हरण्यातून मी नवीन गोष्टी शिकत आहे. प्रत्येक हरण्यातून मला शक्ती मिळत आहे. आज हे माझ्यासोबत घडते आहे उद्या अन्य कुणा पुरुषासोबत घडेल. कदाचित भविष्यात माझ्या मुलासोबतही हे होऊ शकेल. परंतु त्याच्यासोबत असे काही घडावे, असे मला वाटत नाही. त्यामुळेच मी ही लढाई जरी हरलो असलो तरी, पुन्हा लढणार आहे. माझ्या मुलाला भेटणे आणि त्याने मला भेटणे हा आमच्या दोघांचाही हक्क आहे. आम्हा पुरुषांनाही मन असते, भावना असतात याचा विचार करायला हवा. आता आमच्यासारख्या पुरुषांसाठी देखील कायद्याची गरज आहे. ज्यामुळे खोट्या आरोपांखाली अडकलेल्या माझ्यासारख्या पुरुषांना वाचता येईल. आम्हा पुरुषांचे हक्क, त्यांच्या भावनांचाही विचार करा, ते असे पायदळी तुडवू नका,’ असे आवाहन अभिनवने केले आहे.
दरम्यान, अभिनवचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.