अमरावती, दि. २७ : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त डॉ. माधवी सरदेशमुख, उपआयुक्त संगीता लोंढे; तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळघाटचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान त्यांनी भोकरबर्डी, धुळघाट रोड आणि कळमखार येथील अंगणवाडी केंद्रांना भेट देऊन तेथील सुविधा, बालकांचे पोषण व आरोग्य सेवांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बालक, पालक आणि अंगणवाडी सेविकांशी संवाद साधला. त्याचबरोबर स्थानिक आदिवासी महिला बचतगटाच्या सदस्यांशीही संवाद साधून त्यांच्या उपक्रमांची माहिती घेत महिला सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
धारणी येथील पोषण पुनर्वसन केंद्रालाही श्रीमती तटकरे यांनी भेट देऊन तेथील उपचार व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि कुपोषित बालकांच्या उपचारांचा आढावा घेतला. उपचार घेत असलेल्या बालकांच्या मातांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा व पोषण व्यवस्थेची माहिती घेतली. धारणी तहसील कार्यालयात मेळघाटातील महिला व बालविकास विभागाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत बालविवाह प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना, बालकाच्या जन्मानंतरच्या पहिल्या १,००० दिवसांतील पोषणावर भर, अंगणवाड्यांमध्ये सौरऊर्जा, स्वच्छतागृहे व शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, गरोदर मातांसाठी दर्जेदार आहार, अंगणवाडी बांधकामांना गती; तसेच महिला व बालकांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती ग्रामसभांमार्फत तळागाळापर्यंत पोहोचविण्याबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ





















WhatsApp