मौजे कांदिवली येथील शासकीय तलाव परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि.१९: मौजे कांदिवली येथील शासकीय तलाव परिसरातील अतिक्रमणांवर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अन्य प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयाने कारवाई करण्यात आली.

    मौजे कांदिवली येथील न. भू. क्र. १ ब या शासकीय मिळकतीवरील तलावाचे तसेच कांदळवनाचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका क्र. १७९०/२०२१ दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने २१ जुलै २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना तलावाभोवतालची अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश दिले होते.

    उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मौजे कांदिवली येथील साईधाम नगरमधील ५२९ झोपड्या आणि मौजे बोरिवली येथील ४२६ झोपड्यांचे वनविभाग, नगर भूमापन कार्यालय तसेच उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), बोरिवली-१ यांच्या कार्यालयामार्फत सर्वेक्षण करण्यात आले.

    एकूण ९५५ अतिक्रमणधारकांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या कलम ५० (३) अन्वये नोटिसा बजावण्यात आल्या. यापैकी ९१५ अतिक्रमणधारकांनी २०११ पूर्वीचे पुरावे सादर केले आहेत. या अतिक्रमणधारकांची पात्रता निश्चित करण्याचे अधिकार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असल्याने त्यांची प्रकरणे पात्रता निश्चितीसाठी प्राधिकरणाकडे पाठविण्यात आली आहेत.

    उर्वरित ३९ अतिक्रमणधारकांनी २०११ पूर्वीची कागदपत्रे सादर न केल्यामुळे त्यांची अतिक्रमणे १८ नोव्हेंबर २०२६ रोजी निष्कासित करण्यात आली.

    ही कारवाई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), पश्चिम उपनगरे, गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    या मोहिमेत महसूल विभाग, मुंबई पोलीस, बृहन्मुंबई महानगरपालिका, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, नगर भूमापन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन), बोरिवली-१, उज्ज्वला भगत यांच्या नियोजनाखाली ही कारवाई पार पडली.

    या कारवाईत एकूण २५ गुंठे शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून, या जमिनीची अंदाजे किंमत ३५ कोटी रुपये आहे.

    कारवाईचा तपशील :

    • अतिक्रमणमुक्त क्षेत्र : २५ गुंठे
    • ठिकाण : मौजे कांदिवली, साईधाम नगर, भीम नगर आणि आंबेडकर नगर
    • निष्कासित अतिक्रमणे : एकूण ३९ झोपड्या
    • अतिक्रमणमुक्त जमिनीची अंदाजे किंमत : ३५ कोटी रुपये
    • कारवाईची तारीख : १८ नोव्हेंबर २०२६

    मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासकीय तलाव परिसरातील अतिक्रमणे हटविण्याच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

    ००००

    - Advertisement -