स्वच्छ भारत मिशनच्या कामांना गती द्यावी- मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर – महासंवाद

    - Advertisement -

    • जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान चार दिवस क्षेत्रभेटी कराव्यात

    मुंबई, दि.१९: स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या स्वच्छता सुविधांचा प्रत्यक्ष वापर सुरू राहावा, तसेच घनकचरा व प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प प्रभावीपणे कार्यान्वित व्हावेत, यासाठी जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांनी नियमित क्षेत्रभेटी देऊन कामांचा आढावा घ्यावा,असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी दिले.

    स्वच्छ भारत मिशन २.० च्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी स्वच्छता सुविधांची केवळ उभारणी न करता त्यांचा नियमित वापर, कचऱ्याचे योग्य संकलन, विलगीकरण, पुनर्प्रक्रिया आणि देखभाल यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता व्यक्त केली.

    मंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या प्रत्यक्ष कार्यस्थितीची तपासणी करण्यात यावी. ग्रामपंचायतींमध्ये कचरा संकलनासाठी आवश्यक वाहने, सायकली, विलगीकरण शेड आणि कंपोस्ट पिट उपलब्ध असूनही त्यांचा पुरेसा वापर होत नसल्यास संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना कराव्यात. प्रकल्पांमध्ये वीजपुरवठा, मनुष्यबळ किंवा तांत्रिक अडचणी असल्यास त्या स्थानिक पातळीवर सोडवाव्यात. प्रत्येक तालुक्यात पहिल्या टप्प्यात किमान दहा गावांमध्ये स्वच्छता व्यवस्थापनाचे प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करावे. जिल्हा व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान चार दिवस क्षेत्रभेटी देऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी करावी. बैठकीत सहभागी झालेल्या सर्व जिल्ह्यांनी पुढील १५ दिवसांत प्रकल्पांच्या कार्यक्षमतेबाबत ठोस कार्यवाही करावी.

    ग्रामपंचायतींकडे उपलब्ध असलेल्या निधीचा वापर स्वच्छता व पाणीपुरवठा योजनांच्या शाश्वत देखभाल आणि संचालनासाठी करावा. स्वच्छतेसाठी खर्च होणाऱ्या प्रत्येक रुपयाचा योग्य विनियोग होतो आहे की नाही, याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी. केवळ कागदोपत्री प्रगती न दाखवता प्रत्यक्ष कामातून गावांमध्ये स्वच्छता व्यवस्था प्रभावीपणे कार्यान्वित होईल, यासाठी प्रयत्न करावेत, असेही राज्यमंत्री साकोरे-बोर्डीकर यांनी स्पष्ट केले.

    यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव पराग जैन-नैनुटीया, सर्व जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. उपसचिव अनिल धस, अवर सचिव वनिता ना. जाधव, सहसंचालक (वित्त) चंद्रकांत पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

    ००००

    गजानन पाटील/‍ विसंअ

    - Advertisement -